जाहिरात

Ajit Pawar Death: अपघातग्रस्त विमानाचा मालक समोर आला, काय म्हणाला ते ऐकलं का ?

Ajit Pawar Plane Crash Death Reason: या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून AAIB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Ajit Pawar Death: अपघातग्रस्त विमानाचा मालक समोर आला, काय म्हणाला ते ऐकलं का ?
मुंबई:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंगळवारी सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या अपघातात अजित पवारांसह विमानातील दोन वैमानिक, एक सुरक्षा रक्षक आणि एअर होस्टेस अशा एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून AAIB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash: 'क्रॅश' झालेलं राजकारण! संजय गांधी ते अजित पवार; भारतीय नेत्यांचे दुर्दैवी विमान अपघात

कमी दृश्यमानतेमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

अजित पवार मुंबईहून बारामतीला नियोजित कार्यक्रमांसाठी निघाले होते. 'व्हीएसआर एव्हिएशन'च्या (VSR Aviation) 'बॉम्बार्डियर लिअरजेट 45' (Bombardier Learjet 45) या विमानाने ते बारामतीला निघाले होते. बारामती विमानतळावर उतरताना दृश्यमानता केवळ 3000 मीटर होती असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात वैमानिकांनी 'गो-अराउंड' म्हणजेच विमान न उतरवता पुन्हा वर नेण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या प्रयत्नात सकाळी 8:43 वाजता वैमानिकांनी धावपट्टी स्पष्ट दिसत असल्याची पुष्टी केली. मात्र, एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) दिलेल्या लँडिंग क्लिअरन्सला वैमानिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटच्या संपर्कानंतर अवघ्या एका मिनिटात म्हणजेच 8:44 वाजता धावपट्टीच्या डाव्या बाजूला विमानाला आग लागल्याचे आपत्कालीन पथकाच्या लक्षात आले. विमान रनवे सोडून मोकळ्या शेतात कोसळले होते आणि त्याला भीषण आग लागली होती.

नक्की वाचा: आज आपलं काही खरं नाही,हेलिकॉप्टर हादऱ्यांचा अजित पवारांनी सांगितला होता तो अंगावर काटा आणणारा किस्सा

अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू

या अपघातात अजित पवारांसोबतच खालील व्यक्तींचा मृत्यू झाला:
विदिप जाधव: अजित पवारांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO).
कॅप्टन सुमित कपूर: 16,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असलेले अनुभवी वैमानिक.
शांभवी पाठक: फर्स्ट ऑफिसर (सह-वैमानिक), ज्यांना 1500 तासांचा अनुभव होता.
पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.

VSR Aviation च्या मालकाने अपघाताबद्दल काय म्हटले ?

'व्हीएसआर एव्हिएशन'चे मालक व्ही. के. सिंग यांनी तांत्रिक बिघाडाची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांच्या मते, हे विमान पूर्णपणे सुस्थितीत होते आणि त्याचे 'एअरवर्थीनेस सर्टिफिकेट' सप्टेंबर 2026 पर्यंत वैध होते. "हे विमान 2010 मध्ये तयार झाले होते आणि जागतिक स्तरावर 'लिअरजेट' हे अत्यंत विश्वासार्ह विमान मानले जाते," असे सिंग यांचे म्हणणे आहे. तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा करत त्यांनी कंपनीचा ताफा ग्राऊंड (बंद) करण्यासही नकार दिला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com