
अभय भुते, भंडारा
कुलरच्या विजेच्या धक्क्याने 36 वर्षीय पूजा प्रदीप सूर्यवंशी या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पूजा सूर्यवंशी यांच्या जाण्याने त्यांच्या अवघ्या 3 वर्षांच्या मुलाने आईचे छत्र गमावले आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली, ज्यामुळे कणेरी दग गावात शोककळा पसरली आहे.
रांगोळी काढण्याच्या निमित्ताने घडली दुर्घटना
सोमवारी सकाळी पूजा सूर्यवंशी घरासमोर रांगोळी काढण्यासाठी गेल्या होत्या. रांगोळीचा डबा कुलरवर ठेवलेला होता. तो डबा घेण्यासाठी त्या कुलरजवळ गेल्या असता, कुलर जवळच असलेल्या विद्युत मीटरमुळे कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. कुलरला स्पर्श होताच पूजा यांना विजेचा जबर धक्का बसला आणि त्या पुन्हा त्याच कुलरवर कोसळल्या. यामुळे त्यांच्या शरीराचा काही भाग भाजला गेला.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याचे अभियान, 'या' पक्षाने घेतली जबाबदारी)
या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत होते. परंतु वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघ्या तीन वर्षांच्या कार्तिकचे आईचे छत्र हरवले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पूजा यांच्या पार्थिवावर शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुलर आणि विजेच्या उपकरणांची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world