जाहिरात
This Article is From Apr 28, 2024

उष्माघाताचा बळी! उन्हामुळे आली चक्कर, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू

Heatstroke: उष्माघातामुळे तरुणाला चक्कर आली आणि त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. रुग्णवाहिका वेळेमध्ये उपलब्ध न झाल्याने तरुणाला जीव गमवावा लागला.

उष्माघाताचा बळी! उन्हामुळे आली चक्कर, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू

- प्रशांत जव्हेरी/नंदुरबार 

Heatstroke: नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेशी संबंधित समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होताना दिसत आहेत. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे अरविंद वसावे या तरुणाला चक्कर आली आणि तो जागेवरच कोसळला. स्थानिकांनी क्षणाचाही विलंब न लावता खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास सांगितले. पण दोन तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहोचली नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रुग्णवाहिकेच्या इंजिनमध्ये बिघाड

खांडबारा गावातील सरपंच अविनाश गावित यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये पुन्हा संपर्क साधला. दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. सरपंच गावित यांनी 108 क्रमांकावर संपर्क साधून तातडीने रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. स्थानिक व सरपंचांच्या प्रयत्नांमुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि तरुणाला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  

(नक्की वाचा: संतापजनक! रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेची रस्त्यातच प्रस्तूती, नवजात अर्भकाला बांधले झाडाला)

नातेवाईकांचा आक्रोश

मृत पावलेला तरुण सेगवे गावातील रहिवासी होती. उन्हाच्या तीव्र झळांमुळे त्याला चक्कर आली आणि प्रकृतीत बिघाड झाला. शनिवारी (27 एप्रिल) दुपार 1 ते दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर अरविंद वसावे यांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया देत रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी किती निष्पाप आदिवासी नागरिकांचा बळी जाणार? असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला जात आहे.  

(नक्की वाचा: फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, वाढदिवसापूर्वीच चिमुकल्याला मृत्यूने कवटाळलं)

नंदुरबार जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात रुग्णवाहिकेअभावी आदिवासी नागरिकांचा मृत्यू होण्याच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.   

VIDEO: पाणी टंचाईच्या झळा शहरी पट्ट्यातही, रोजच्या पाण्यासाठी मीरा-भाईंदरवासियांची वणवण

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com