जाहिरात
Story ProgressBack

महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या दक्षिण मुंबईचा कारभारी कोण होणार?

संपूर्ण राज्याचा कारभार चालतो, त्या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याची प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते. ऐकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत होणार आहे.  

Read Time: 2 min
महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या दक्षिण मुंबईचा कारभारी कोण होणार?
मुंबई:

महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र जिथं आहे, ज्या भागात राज्यपाल, मुख्यमंत्री, सर्व मंत्री यांचं शासकीय निवासस्थानं, शासकीय गेस्ट हाऊस, विधानभवन, मंत्रालय आहे तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई. संपूर्ण राज्याचा कारभार चालतो, त्या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याची प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते. ऐकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत होणार आहे.  

काय आहे इतिहास?

स्वातंत्र्यानंतरचे मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते स.का. पाटील हे दक्षिण मुंबईचे पहिले खासदार. 1952, 1957 आणि 1962 साली ते या मतदारसंघातून निवडून आले. 1967 साली जॉर्ज फर्नांडीस यांनी त्यांचा पराभव करत 'जायंट किलर' अशी स्वत:ची ओळख देशभर निर्माण केली. 1971 च्या इंदिरा लाटेत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघानं 1977 आणि 80 मध्ये जनता पार्टीला कौल दिला. 1984 मध्ये मुंबई काँग्रेसमधील आणखी एक दिग्गज नेते मुरली देवरा इथून पहिल्यांदा खासदार झाले.

1996 आणि 1999 मध्ये भाजपाच्या जयंतीबेन मेहता इथून निवडून आल्या होत्या.  2004 आणि 2009 मध्ये मिलिंद देवरा यांच्या रुपानं काँग्रेसचा इथून खासदार होता. त्यानंतर गेली दहा वर्ष शिवसेनेचे अरविंद सावंत इथून खासदार आहेत. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटामध्ये असून ते विजयाची हॅट्र्रिक करण्याच्या उद्देशानं यंदा मैदानात उतरणार आहेत. 

कुणामध्ये बिग फाईट?
 

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठी उलथापालथ झालीय.शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडलीय. त्यांचे दोन गट यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत. या बदलाचे पडसाद दक्षिण मुंबईतही उमटलेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघात वरळी,शिवडी,भायखळा,मलबार हिल,मुंबादेवी आणि कुलाबा या विधानसभा येतात. त्यापैकी  वरळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, शिवडीमध्ये अजय चौधरी,भायखळामध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव, मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे आमिन पटेल हे आमदार आहेत.

भाजप देणार धक्कातंत्र?

या मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजपानं कंबर कसलीय. भाजपकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत, पण त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. निवडणुकीच्या तिकीट वाटपात धक्कातंत्र वापरण्याचा भाजपाचा पॅटर्न आता सर्वांच्याच परिचयाचा झालाय.  त्यामुळे अपेक्षेप्रमाणे भाजपा नार्वेकरांना तिकीट देणार की ऐनवेळी धक्कातंत्र वापरणार हे तिकीटवाटपानंतरच स्पष्ट होईल.

कोण ठरणार X फॅक्टर?

दक्षिण मुंबईतील वरळी, शिवडी, भायखळा या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. या मतांवर डोळा ठेवून मनसेनं निवडणूक लढवल्यास दक्षिण मुंबईतील समीकरण आणखी रंगतदार होऊ शकतं. मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा आहे. एमआयएमचे वारीस पठाण दक्षिण मुंबईतील भायखळा विधाननसभा मतदारसंघातून एकदा आमदार होते. या मतदारसंघातील मुस्लीम मतांच्या आधारावर एमआयएमनंही ही निवडणूक लढवली तर दोन्ही प्रमुख आघाड्यांसाठी ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरु शकते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination