सांगली लोकसभा कोणाच्या वाट्याला जाणार यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. शेवटी ठाकरे गटाने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. पण त्याचा फारसा उपयोग ठाकरे गटाला झाला नाही. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी ही जागा दणदणीत मताधिक्याने जिंकली. शिवाय सांगलीत काँग्रेसचीच ताकद असल्याचे दाखवून दिले. लोकसभा निवडणूक आता झाली आहे. सर्वांना विधानसभेचे वेध लागले आहेत. सांगली लोकसभेत काँग्रेसचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते एकसंध पणे विशाल पाटील यांच्या मागे उभे राहीले. आता तेच नेते विधानसभेला पक्षाने आमच्या मागे उभे रहावे अशी आशा बाळगून आहेत. त्यामुळे सांगली विधानसभेवर एका पेक्षा जास्त जणांनी दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस समोर उमेदवारी देताना डोकेदुखी असणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून अनेकांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. यात प्रमुख चेहरे आहेत ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील. या दोघांनीही लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचे काम केले. त्यांना जिंकून आणण्यात योगदान दिले. मागील वेळी संधी हुकली मात्र यंदा सांगली विधानसभा निवडणुकीत उभे राहणार असा निर्धार काँग्रेसनेत्या माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यांनी या मतदार संघावर दावाच केला आहे. शिवाय मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने त्यांनी मतदार संघात कामालाही सुरूवात केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले
सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांनी मोठे विधान करत आपलाही दावा ठोकला आहे. काही झालं तरी निवडणूक लढणार असे वक्तव्य करत त्यांनी स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. मागच्या वेळी संधी हुकली मात्र यावेळी जनतेतूनच आमदार व्हावं अशी कार्यकर्त्यांची आणि माझी इच्छा आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहे तसेच जनतेमधूनच आमदार व्हावी अशी सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar : जीवात जीव आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही : अजित पवार
जयश्री पाटील यांनी सांगली विधानसभेवर दावा केला आहे. तर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मागील वेळी ते अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे. अशा वेळी जिल्ह्याचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम आणि नवनिर्वाचीत खासदार विशाल पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यांना या दोन पैकी एकाला संधी द्यावी लागणार आहे. तर एकाची समजूत घालावी लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world