
विधीमंडळाच्या सदनात बसून रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडीओने कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची जाम पंचाईत झाली आहे. कोकाटे यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. मला 'रमी' खेळता येत नाही, चौकशीनंतर दोषी आढळलो तर न मागता राजीनामा देईन अशी भूमिका कोकाटेंनी जाहीर केली. मोबाईलवर गेमची एक जाहिरात आली होती ती स्कीप करता न आल्याने मी ऑनलाईन पत्ते खेळत असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले की, " मला सांगा! पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय."
( नक्की वाचा: राजीनामा द्यावाच लागेल! रम्मी माहित नाही म्हणणाऱ्या कोकाटेंचा नवा VIDEO समोर )
कोकाटे खोटं बोलतायत, पवारांचा आरोप
रोहित पवारांनी एक ट्विट करताना म्हटलंय की, "सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना' या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर' अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती."
राजीनाम्याची मागणी
रोहित पवारांनी पुढे म्हटलंय की, "विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?"
#राजीनामा_द्यावाच_लागेल!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2025
सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना' या चर्चेत… pic.twitter.com/KQJE4eHtwz
( नक्की वाचा: राजीनामा देण्यासारखं घडलं काय? कृषिमंत्री कोकाटेंचा सवाल, बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार )
व्हिडीओ कोणी काढला ?
कोकाटे यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी X वर एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, "कृषिमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ याबाबत कुणी समर्थन करणार नाही, ज्यांनी व्हायरल केला त्यांनाही दोष नाही मात्र विधानपरिषदेच्या गॅलरीमधुन zoom करून अशा प्रकारचे व्हिडिओ विरोधकांना कुणी दिले? सोबतच चित्रीकरण नियमाच्या पायमल्ली चे काय?हे प्रश्न अनुत्तरीत राहतात."
कृषिमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ याबाबत कुणी समर्थन करणार नाही, ज्यांनी व्हायरल केला त्यांनाही दोष नाही मात्र विधानपरिषदेच्या गॅलरीमधुन zoom करून अशा प्रकारचे व्हिडिओ विरोधकांना कुणी दिले? सोबतच चित्रीकरण नियमाच्या पायमल्ली चे काय?हे प्रश्न अनुत्तरीत राहतात.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 22, 2025
राजकारणामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्ते पिसलेले आहेत. विरोधक कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा 'पत्ता' कट करण्याचा जोरकस प्रयत्न करताना दिसतायत तर सत्ताधारी विरोधकांवर डाव उलटवून गेम साधण्याची संधी शोधत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world