महाराष्ट्राच्या राजकारणात जलसिंचन विभाग हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता 1999 पूर्वीच्या युती सरकारच्या काळातील एका जुन्या प्रकरणावरून खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेचा खर्च केवळ राजकीय पक्षनिधी गोळा करण्यासाठी तब्बल 100 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला होता, असा थेट दावा पवार यांनी केला आहे. अजित पवार यांचा रोख भाजपच्या एका नेत्याकडे असल्याचे बोलले जात आहे कारण हा नेता त्यावेळी जलसंपदा मंत्री होता. या नेत्याचे नाव घेणे अजित पवारांनी जाणीवपूर्वक टाळले आहे.
नक्की वाचा: BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशीरा लागणार? काय आहे कारण?
220 कोटींचा प्रकल्प 330 कोटींवर कसा पोचला?
अजित पवार यांच्या दाव्यानुसार, विलासराव देशमुख सरकारमध्ये जेव्हा जलसंपदा खाते त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. मूळ 220 कोटी रुपयांची असलेली ही योजना अचानक 330 कोटींवर कशी पोहोचली, याचे उत्तर शोधताना एका निवृत्त अधिकाऱ्याने धक्कादायक कबुली दिली. "पक्षनिधीसाठी तत्कालीन मंत्र्यांनी 100 कोटी रुपये वाढवण्याचे आदेश दिले होते आणि त्या ओघात अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी वाढवले," असे पवारांनी म्हटले आहे
नक्की वाचा: कृषी अधिकाऱ्याची दादागिरी! तक्रार केल्याच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ
भाजपला बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न?
ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे, जर ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता असे अजित पवार यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत जुनी 'सिंचन फाईल्स' उघडून पवारांनी भाजपला बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप अजित पवारांच्या आरोपांना कशा पद्धतीने उत्तर देतंय याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world