सूरज कसबे, प्रतिनिधी
Ajit Pawar Speech : अजित पवारांच्या अकाली मृत्यूने देशभरात दु:खाची लाट पसरली. राजकारणातील धडाडीचं नेतृत्व म्हणून अजितदादांची ख्याती होती. अजितदादांच्या अकाली एक्झिटने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर अजितदादांच्या भाषणाचे व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या आठणवींना उजाळा दिला जात आहे. कणखर नेतृत्व आणि सर्वांशी दिलखुलास गप्पा मारणे अजितदादा जनतेच्या मनात आजही घर करून आहेत. 'कामाचा माणूस' म्हणून त्यांच्यावर कार्यकर्त्यांसह जनतेनं शेवटपर्यंत विश्वास ठेवला. नेटकरी आणि त्यांचे चाहते त्यांच्या व्हिडिओंना भरभरून पसंती देत आहेत. विशेषतः हडपसर भागातील एका सभेतील त्यांचा वडार भाषेतील संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
अजित पवार त्या सभेत नेमकं काय म्हणाले?
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान हडपसर भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेत बोलताना त्यांनी वडार समाजाचे उमेदवार आनंद आलकुंटे यांचा उल्लेख केला.वडार समाजाशी नातं जोडताना अजितदादांनी त्यांच्याच बोलीभाषेत 'वच्चा रे वच्चा घड्याळ वच्चा' अशी घोषणा दिली होती.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर
'वच्चा' शब्दाचा अर्थ काय ?
वडार भाषेत 'वच्चा'या शब्दाचा अर्थ आला असा होतो. म्हणजेच 'आला रे आला घड्याळ आला' असा या घोषणेचा सोपा अर्थ आहे. आपल्या नेत्याला आपल्याच भाषेत बोलताना पाहून त्यावेळी उपस्थित समुदायात मोठा उत्साह संचारला होता.अजित पवारांचे सर्व समाजघटकांवर असलेले प्रेम आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची ही खास शैली या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आली आहे.
अजित पवारांचं सर्व समाजातील लोकांवर होतं विशेष प्रेम
अजित पवारांनी नेहमीच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्यावर भर दिला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ (ड) मधून त्यांनी वडार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आनंद आलकुंटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी दिली होती. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या प्रशांत तुपे यांनी आलकुंटे यांचा अवघ्या ३७५ मतांनी पराभव केला होता.
नक्की वाचा >> Ajit Pawar: '9 तारखेला अजितदादा परत येतायत', 'त्या' पोस्टमुळे अनेकांचा उडालाय गोंधळ, सत्य काय?
मात्र,दादांनी एका सामान्य कार्यकर्त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेली ही संधी आजही कार्यकर्ते मोठ्या अभिमानाने आठवतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंमुळे अजितदादांच्या चाहत्यांमध्ये भावुक वातावरण पाहायला मिळत आहे.दादा आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत,अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world