![Devendra Fadnavis:अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद! अमित शहा त्या वेळी काय म्हणाले होते, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट Devendra Fadnavis:अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद! अमित शहा त्या वेळी काय म्हणाले होते, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट](https://c.ndtvimg.com/2025-02/j7h4rudo_devendra-fadnvis-_625x300_08_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
उद्धव ठाकरे हे नेहमी आपल्याला अमित शहा यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असा दावा करतात. हे वचन बाळासाहेबांच्या खोलीत दिलं होतं असं ही ठाकरे सांगतात. पण मुख्यमंत्रिपदाबाबत काय घडलं होतं? ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची मागणी कधी केली होती? त्यानंतर कशा घटना घडत गेल्या? याचा घटनाक्रमच फडणवीसांनी पहिल्यांदाच जाहीर पणे मांडला. शिवाय उद्धव ठाकरेंनी आपलं मत कसं एका तासात बदललं असंही त्यांनी सांगितलं. ठाकरे आपले फोन ही कसे घेत नव्हते याचाही खुलासा पुन्हा एकदा फडणवीस यांनी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्रिपदाची बोलणी ही लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती असंही फडणवीसांनी सांगितलं. लोकसभेची निवडणूक होती. युतीचे जागा वाटप पूर्ण झाले होते. त्याच वेळी मध्यरात्री एक वाजता उद्धव ठाकरेंचा फोन आपल्याला आला होता असं फडणवीसांनी सांगितलं. त्यात त्यांनी शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद मिळालं पाहीजे ही मागणी केली. मात्र यावर आपण निर्णय घेवू शकत नाही. हा निर्णय केंद्रीय नेते घेतली असं आपण ठाकरेंना सांगितलं होतं. शिवाय हीबाब अमित शहांच्या कानावर घालतो असंही ठाकरेंना सांगितलं.
त्यानंतर लगेचच आपण अमित शहा यांना फोन केला होता. शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद हवे आहे. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. त्याच वेळी अमित शहा यांनी भाजप कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देणार नाही असं सांगितलं. मात्र असं शिवसेनेला सांगितलं तर ते युतीत राहाणार नाहीत. ते वेगळे लढतील असं आपण शहा यांना सांगितलं. त्यावर शहा यांनी युती होवू शकत नाही. आपण ही वेगळे लढू असं स्पष्ट केलं. ही निरोप उद्धव ठाकरे यांना सांगितला. मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्रिपद देवू असं सांगितलं.
त्यावर उद्धव ठाकरे यांनी लगेच नकार दिला. त्यांनी युती तुटली असं सांगितलं. पण काही दिवसांनी पुन्हा एक फोन आला. उद्धव ठाकरे यांना चर्चा करायची आहे. पण अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदावर चर्चा होवू शकत नाही असं आपण त्यांना सांगितलं. मात्र ती मागणी उद्धव ठाकरे यांनी सोडली आहे असं सांगण्यात आलं. मात्र त्यांनी लोकसभेची एक जागा मागितली. ती जागा पालघरची होती. त्याला आम्ही नकार दिला होता. ही बाब अमित शहा यांनाही सांगण्यात आली. त्यावर त्यांनी एका जागेचा प्रश्न आहे तर ती शिवसेनेला सोडा असं सांगितलं. त्यानंतर उमेदवारासह पालघरची जागा शिवसेनेला दिली होती असं फडणवीस म्हणाले.
त्यानंतर विधानसभे वेळी अमित शहा मातोश्रीवर आले होते. त्या दोघामध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. मात्र ती अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतरच्या प्रेसमध्ये काय बोलायचं हेही तिथेच ठरलं होतं. सत्तेचे समान वाटप होईल हे ही तिथेच ठरलं होतं. मात्र मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली नव्हती. मात्र ज्या वेळी निकाल लागला त्यावेळी नंबर गेम पाहाता उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली. ते आपले फोनही घेत नव्हते. जर त्यांना चर्चा करायची होती तर त्यांनी आपले फोन घ्यायला पाहीजे होते असंही ते म्हणाले. पण त्यांचे निवडणुकी आधीच शरद पवारांबरोबर ठरलं होतं असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं. दरम्यान दिल्ली विधानसभा निकालावर फडणवीसांनी समाधान व्यक्त केलं. एक है तो सेफ है हे संपुर्ण देशाने स्विकारल्याचं ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world