जाहिरात

Nilesh Rane : 'राणेंनी सांगितले तरच निलंबन मान्य'; कुडाळमधील 6 नगरसेवकांवरील कारवाईवरून भाजपामध्ये धुसफूस

BJP Faces Revolt in Kudal Nagar Panchayat: हे सर्व प्रकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्यातील सुप्त संघर्षातून निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Nilesh Rane : 'राणेंनी सांगितले तरच निलंबन मान्य'; कुडाळमधील 6 नगरसेवकांवरील कारवाईवरून भाजपामध्ये धुसफूस
कुडाळ, सिंधुदुर्ग:

गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी

BJP Faces Revolt in Kudal Nagar Panchayat: कोकणातील राजकारणातून मोठी बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ कुडाळ नगरपंचायतीच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षाच्या 6 नगरसेवकांना निलंबित केल्याची मोठी घोषणा बुधवारी (3 सप्टेंबर) केली. त्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी थेट खासदार नारायण राणे यांचे नाव घेत या निर्णयाला आव्हान दिले आहे. यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, हे सर्व प्रकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्यातील सुप्त संघर्षातून निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या 6 नगरसेवकांना निलंबित केले आहे. या संदर्भात त्यांनी ऑगस्टमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र दिले होते. एकाच वेळी 6 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवक विलास कुडाळकर (गटनेता), अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर आणि चांदणी कांबळी यांनी ‘सिद्धिविनायक नगर विकास आघाडी' हा गट स्थापन केला होता. जिल्हाध्यक्षांनी पत्रात स्पष्ट  केल्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून हे 6 नगरसेवक पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा धोरणात्मक निर्णयात सहभागी होत नव्हते. वारंवार सूचना देऊनही त्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे अखेर पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

( नक्की वाचा : Manoj Jarange Patil : फडणवीसांनी असा तयार केला मसुदा, पहिल्याच बैठकीत जरांगे झाले राजी, वाचा नेमकं काय घडलं? )
 

याच गटातील इतर 2 नगरसेवक, संध्या तेरसे आणि रामचंद्र परब, हे मात्र भाजपच्या धोरणांनुसार काम करत आहेत. त्यामुळे निलंबनाची कारवाई केवळ 6 नगरसेवकांवर करण्यात आली असून, या 2 नगरसेवकांना गटातून वगळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. हे 2 नगरसेवक गटात राहू इच्छित नाहीत, असेही पत्रात म्हटले आहे.

राणेंनी दिले थेट आव्हान

या निलंबनाच्या कारवाईनंतर आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X' वरून भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "सिंधुदुर्गात भाजपचे सर्व निर्णय खासदार नारायण राणे घेतात. आम्हाला ज्या दिवशी खासदार राणे साहेब सांगतील, त्या दिवशीच आम्ही हे निलंबन मान्य करू. तोपर्यंत या पत्राला आम्ही किंमत देत नाही," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. निलेश राणेंनी थेट जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेला आव्हान दिल्याने हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com