
अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
राज्यात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena UBT) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) एकत्र येणार का? ही चर्चा सुरु आहे. त्यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुनगंटीवार?
महानगरपालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून युतीच्या या चर्चा होत आहेत. त्याचबरोबर महायुतीसारखा बलाढ्य पक्ष समोर असल्यामुळे आपल्यालाही एकत्र येऊन जास्त जागा निवडून आणता येईल का, हाही भाव असू शकतो. पण मला वैयक्तिकरित्या असे वाटते की मराठी भाषिकांच्या हितासाठी जर हे दोन पक्ष एकत्र येत असतील तर भाजपला त्याचे स्वागत करायला काहीच अडचण येणार नाही, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.
ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार का?
राज्यातील ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. त्या विषयावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, या प्रकारे कुणी कोणाचा ब्रँड संपवू शकत नाही. काँग्रेस कधी जनसंघ आणि भाजपचा ब्रँड संपवू शकली नाही. भाजपही कधी कुठल्या पक्षाला संपवू शकत नाही. तुम्ही कृती कशी करता, पक्षीय राजकारणात कसे वागता, कार्यकर्त्यांशी कसे वागता, यावर हे अवलंबून आहे, असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : केंद्रीय मंत्र्यांनी केला उद्धव ठाकरेंना फोन ! दोन्ही नेत्यांमध्ये काय झाली चर्चा? )
संजय राऊत काय म्हणाले?
दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही स्वतः उद्धव ठाकरेसाहेब आणि शिवसेना मनसेसोबत राज ठाकरेंच्या नाते जोडायला आमची नक्कीच सकारात्मक भूमिका ठेवली आहे. कोण काय बोलते यापेक्षा ठाकरे काय बोलतात हे महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि दोघांवरही जतनेचे प्रेशर आहे. हे प्रेशर जसे भावनिक आहे तसे राजकीय आहे,' असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world