विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वांनीच सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारही कुठून लढता येईल याची चाचपणी करत आहेत. त्यामुळे इच्छुकांनी गाठीभेटींचा धडाका लावला आहे. पण भाजप पदाधिकाऱ्याने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या आधी ही भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत उमेदवारी मागितली होती. त्यात एक माजी आमदारही आहेत. आता भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांनीही बीडमधून जरांगे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवाली सराटटी येथे ही भेट झाली. यावेळी पोकळे यांनी बीड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रमेश पोकळे यांनी या पूर्वी शिक्षक पदवीधर मतदार संघातून भाजपा कडून निवडणूक लढली आहे.या वेळी त्यांना विधानसभेचे वेध लागले आहे. त्यामुळेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरी आपण भाजपमध्ये असलो तरी समाजासाठी इथे आलो आहे असं यावेळी पोकळे म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?
या पूर्वी बीड मधून भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनीही जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर माजी आमदार संगीता ठोबरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.बीड जिल्ह्यातील भाजपमधील देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थकचं जरांगे पाटील यांची भेट घेत आहे. केवळ भेट होत नाही तर हे नेते जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी ही मागत आहेत. त्यामुळे बीडमध्ये भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी जरी असलो तरी समाजासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवले आहेत. मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून समाजाचे काम गेल्या दीड वर्षापासून करत आहे. त्यामुळे राजकीय भूमिका घेतल्यास माझ्या नावाचा विचार करावा अशी विनंती आपण जरांगे यांना केल्याचे पोकळे यांनी यावेळी सांगितले. शिवाय लोकसभेलाही आपण पक्षासाठी सक्रीय नव्हतो. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे ही आपलही भूमिका आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांच्या बरोबर असल्याचे ते म्हणाले. उमेदवारी दिल्यास नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र उमेदवारी देणार की नाही याबाबत कोणतेही ठोस आश्वासन जरांगे पाटील यांच्याकडून मिळाले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world