महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टाळी देऊन 10 दिवस उलटले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार का? हे अद्याप स्पष्ट नाही. पण, या टाळीचा आवाज अजूनही घुमतोय. कारण, मनसेनं आयोजित केलेल्या मुंबई महापालिकेतल्या प्रतिसभागृहामध्ये सहभागी होण्यास भाजपानं नकार दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपाच्या पत्रात काय?
मनसेनं या प्रतिनिधी सभागृहामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण शिवसेना उबाठा पक्षालाही दिलेलं आहे. त्यामुळे भाजपानं नाराजी व्यक्त केली असून प्रतिनिधी सभागृहामध्ये सहभागी होण्यास नकार दिलाय. 25 वर्षे पराकोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा, भाजप रस्त्यावर उतरुन, मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी, या पूर्वीप्रमाणेच सातत्याने अग्रेसर आणि कटिबद्ध राहील, असं पत्र भाजपानं पाठवलंय.
( नक्की वाचा : 'आमची जीभ पोळलीय, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा?' संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल )
मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांना टार्गेट केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दुराव्याला सुरुवात झाली. मनसेनं आजपासून या प्रतिसभागृह उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्याच्या पहिल्या भागात मनसेनं सर्वपक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं.
या प्रतिसभागृहासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे, भाजपाचे आशिष शेलार, शिवसेनेचे उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना मनसेनं निमंत्रित केले होते. त्यामधील आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. पण, सकाळपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेच्या हँडल्सवर एकत्र येण्याच्या पोस्ट झळकू लागल्या होत्या.
प्रतिसभागृहात काय होणार?
मनसेनं बोलवलेल्या प्रतिसभागृहामध्ये प्रतिमहापौर निवडले जातील. प्रतिसभागृहासाठी उपस्थित सदस्य मुद्दे उपस्थित करणार आहेत. रस्त्यावर 45 मिनिटे, आरोग्यावर 30 मिनिटे आणि आपत्ती व्यवस्थापनावर 30 मिनिटे चर्चा होईल. या कामकाजाचा वृत्तांत मनसेकडून विद्यमान मनपा आयुक्तांना पाठवला जाणार आहे.
मनसेनं आधी ठाकरेंकडे टाळीसाठी हात पुढे केला. त्यापाठोपाठ प्रतिसभागृहाचं आयोजन केलं. पण, व्यवस्थेच्या विरोधात पक्षच एकवटले नसतील तर या प्रतिसभागृहाचा उपयोग काय असा प्रश्न विचारला जात आहे.