विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ पाहात या पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. पाच पैकी तीन जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. भाजपने आपल्या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार निश्चित केल्याचे समजत आहे. शिवाय त्यांना मुंबईत येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा येणार आहे. या जागेवर वर्णी लागावी यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्यातून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची दाट शक्यता आहे. रघुवंशी यांना आमदारकी मिळाल्यास जिल्ह्यातील राजकारणा मोठा उलटफेर होवू शकतो. चंद्रकांत रघुवंशी यांना पक्षाकडून मुंबईला बोलावण्यात आले आहे. त्यानुसार ते मुंबईला रवानाही झाले आहेत.
चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना आमदारकीचा शब्द दिला होता. त्यामुळे ते यावेळी आपला शब्द पाळतील असा विश्वास रघुवंशी यांच्या समर्थकांना आहे. रघुवंशी हे पहिले ही विधानपरिषदेवर राहीले आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग नंदूरबार जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्यांना आमदारकी मिळाल्यास पक्षाला जिल्ह्यात मोठी ताकद मिळेल असा दावाही त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रघुवंशी यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. विधानसभेत महायुतीचे 237 ऐवढ्या आमदारांचे प्रचंड संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे पाचही आमदार निवडून येण्यास कुठलीही अडचण नाही. पाचपैकी तीन जागा या पुढील वर्षी मे महिन्यात रिक्त होणार आहेत. तर बाकीच्या दोनपैकी एक जागा 2030 पर्यंत आहे. तर दुसरी जागा 2028 पर्यंत आहे. यातील तिघांना वर्षभरापुरतीच आमदारकी मिळणार आहे.
विधान परिषदेवर असलेल्या प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर हे भाजपचे सदस्य विधानसभेत निवडून गेले आहेत. तर राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे गट ) हे दोघेही विधानसभेवर निवडून आले आहेत. हे पाचही जण विधानसभेवर निवडून गेल्या मुळे त्यांची विधान परिषदेतील आमदारकी आपोआप संपुष्टात आली आहे. पाच पैकी तीन जागा या भाजपच्या आहेत. तर एक एक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची आहे.