दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे.आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे. इंडिया आघाडीत फूट पडली आहे. आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढत आहेत. अशा स्थितीत एनडीएच्या एका घटक पक्षानेही दिल्ली निवडणुकीत वेगळी चुल मांडली आहे. त्यांनी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातही उतरवले आहेत. या पक्षाचे एक मंत्रीही मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत हे विशेष. असं असलं तरी आपली लढत आप बरोबर असल्याचा दावा ही या नेत्यानं केला आहे. अशा स्थितीत त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांचा फटका कोणाला बसणार याबाबत उत्सुकता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एनडीएचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा घटक पक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले रामदास आठवले हे मोदी सरकारमध्ये मंत्रीही आहेत. असं असलं तरी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत वेगळी चुल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने त्यांनी आपले 15 उमेदवार ही रिंगणात उतरवले आहेत. मात्र उर्वरीत जागांवर आपला भाजपला पाठिंबा असेल असं त्यांनी जाहीर केलं आहे. दिल्लीत भाजपचं सरकार बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत जरी आपण उमेदवार उभे केले असले तरी आपण अजूनही एनडीएचाच भाग असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
रामदास आठवले
यावेळी रामदास आठवले यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची वारंवार संधी मिळाली. पण त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती त्यांना पुर्ण करता आली नाहीत. त्यांनी दिल्लीतील जनतेची फसवणूक केली असा आरोप आठवले यांनी यावेळी केला. शिवाय केजरीवाल हे जेलमध्ये जावून आले आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीचे नाव खराब केले आहे. पूर्वांचलच्या लोकांना ते खोटे म्हणतात. त्याच लोकांच्या मतांवर ते जिंकले होते याचा विसर त्यांना पडला आहे असंही आठवले म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?
भाजपला या निवडणुकीत नुकसान होवू नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही केवळ 15 जागांवर उमेदवार उभे केले आहेत असंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. उर्वरीत जागांवर आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे. दिल्लीत भाजपची सत्ता आली पाहीजे अशी आमची भूमीका आहे असंही ते म्हणाले. इंडिया आघाडीत सध्या फूट पडलेली आहे. काँग्रेस आप एकमेका विरोधात लढत आहेत. अशा स्थितीत अरविंद केजरीवाल यांना हरवा आणि भाजपला जिंकवा असं आवाहन ही आठवले यांनी दिल्लीतील मतदारांना केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world