जाहिरात

'व्यक्तीला विरोध नाही, डोंबिवली बकाल कुणी केले ?' RSS च्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सवाल

2009 साली डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण पहिल्यांदा आमदार झाले. गेल्या पंधरा वर्षात चव्हाण यांचं राजकीय वजन वाढलं. त्यांचा पक्षांतर्गत विकास झाला पण, डोंबिवली शहरातील अनेक नागरिक आजही मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत.

'व्यक्तीला विरोध नाही, डोंबिवली बकाल कुणी केले ?' RSS च्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सवाल
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचा ठाणे जिल्ह्यातला बालेकिल्ला अशी डोंबिवली शहराची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं व्यापक जाळं डोंबिवलीमध्ये आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत. भाजपाचा बालेकिल्ला असल्यानं 2009 पासून सातत्यानं चव्हाण डोंबिवलीतून निवडून येत आहेत. सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सांस्कृतीक शहरातील नागरिक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित का? असा प्रश्न डोंबिवलीमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विचारत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना संघाच्या वर्तुळातून नाराजी व्यक्त झाल्यानं चव्हाणांची डोकेदुखी वाढली आहे. संघ कार्यकर्त्यांची नाराजी चव्हाणांना भोवणार की ते निवडणुकीपूर्वी मार्ग काढणार हा प्रश्न विचारला जातोय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एकहाती वर्चस्व

कल्याण डोंबिवली महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1995 साली झाली. तेव्हापासून मधली अडीच वर्षे सोडली. तर या शहरांवर शिवसेना भाजपची सत्ता होती. या शहरात विरोधक नावाला होते. 2009 साली डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण पहिल्यांदा आमदार झाले. गेल्या पंधरा वर्षात चव्हाण त्याचं राजकीय वजन वाढलं. त्यांचा पक्षांतर्गत विकास झाला पण, डोंबिवली शहरातील अनेक नागरिक आजही मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत.

डोंबिवलीतील अनेक भागात पाण्याची समस्या आहे. रस्त्याची दूरावस्था आहे.अस्वच्छता, वाहतूक कोंडी यांचा डोंबिवलीकरांना सामना करावा लागतो. लाखो डोंबिवलीकर रोज पोटापाण्यासाठी मुंबईत लोकलनं जातात. कामाच्या वेळी लोकल पकडण्यासाठी त्यांना जीवघेणी कसरत करावी लागते. त्यांना हवी ती लोकल पकडता येत नाही. प्रवाश्यांनी सातत्यानं मागणी करुनही लोकलच्या फे-या पुरेशा वाढलेल्या नाहीत. त्यामुळे डोंबिवलीकरांना रोज लोकलमध्ये लटकूनच मुंबईत प्रवास करावा लागतोय. मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. रुग्णालयं नाहीत, विरंगुळा केंद्र नाहीत. त्यामुळे डोंबिवलीकरांंचं भवितव्य काय? असा प्रश्न विचारला जात आहे. 

( नक्की वाचा : ब्राह्मण उमेदवाराची मागणी, संघाचा विरोध; डोंबिवलीचा गड रविंद्र चव्हाण कसा राखणार? )

ज्येष्ठ संघ कार्यकर्ते नाराज

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार ही चर्चा सुरु आहे. त्याचवेळी महायुतीमध्येही अनेक प्रश्न उपस्थित आहेत. मुख्य म्हणजे रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नागरी समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली. 

आमचा व्यक्तीला विरोध नाही. त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. बदल हवा आहे. मात्र उमेदवार बदलून काही फरक पडेल असं आम्हाला वाटत नाही. जे लोक कार्यरत आहेत. त्यांनी बदल घडवलेला नाही. त्यांनी स्वत:हून बाजूला होणे अपेक्षित आहे. माणूस चांगला असून फायदा काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संघ कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा काय रणनिती आखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com