जाहिरात

Assembly Election 2024 : ब्राह्मण उमेदवाराची मागणी, संघाचा विरोध; डोंबिवलीचा गड रविंद्र चव्हाण कसा राखणार?

Assembly Election 2024 : ब्राह्मण उमेदवाराची मागणी, संघाचा विरोध; डोंबिवलीचा गड रविंद्र चव्हाण कसा राखणार?
डोंबिवली:

सध्या संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणूकीची धामधूम  सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा स्वरुपता यंदाच्या निवडणुकीचं चित्र पहायला मिळणार आहे. लोकसभेत 400 पार जागा मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या आपल्या नव्या मित्रांसोबत जागावाटपाचा तिढा सोडवण्यात भाजपची नेतेमंडळी सध्या व्यस्त आहेत.

एकीकडे चर्चांचं सत्र सुरु असलं तरीही राज्यात काही ठिकाणी भाजपला पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मतदारसंघात विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासाठी यंदाची लढाई अशाच पद्धतीने कठीण होणार असल्याची चिन्ह आहेत. स्थानिक पातळीवर भाजपमधील पदाधिकाऱ्यांची नाराजी, त्यातच संघाकडून होणारा विरोध आणि ब्राह्मण उमेदवार देण्याची होत असलेली मागणी या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांना आपला डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार असं चित्र दिसत आहे.

भाजपचा पारंपरिक मतदारसंघ पण चव्हाणांच्या नावाला विरोध -

डोंबिवली मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. ब्राह्मण मतदारांचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात २००९ पासून रविंद्र चव्हाण हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकून येत आहेत. याव्यतिरीक्त गुजराती, मारवाडी आणि महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातले मतदार या मतदारसंघात आहेत.­ आतापर्यंत रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली आपल्या ताब्यात ठेवली असली तरीही यंदाच्या निवडणुकीत त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे.

NDTV मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवर भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेतृत्व हे रविंद्र चव्हाण यांच्या नावाला अनुकूल नसल्याचं कळतंय. यापैकी काही पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे डोंबिवलीमध्ये उमेदवार बदलाची मागणी केल्याचंही कळतंय.

डोंबिवलीत ब्राह्मण उमेदवार देण्याची स्थानित पातळीवर मागणी -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार देण्याची मागणी जोर धरत आहे. भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी आणि संघाच्या नेतृत्वाने ही मागणी केल्याचं कळतंय. डोंबिवलीत ब्राह्मण उमेदवारांचा असलेला वरचष्मा लक्षात घेऊन सध्याच्या घडीला सुधीर जोगळेकर, उदय कर्वे, राहुल दामले आणि मंदार हळबे या चार उमेदवारांची नाव चर्चेत असल्याचं कळतंय. यापैकी राहुल दामले आणि मंदार हळबे हे दोन उमेदवार माजी नगरसेवक असल्यामुळे  राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचं पारडं हे जड मानलं जात आहे.

त्यातही मंदार हळबे यांनी याआधी 2019 सालात मनसेच्या तिकीटावर डोंबिवलीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. 2019 च्या निकालादरम्यान सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मंदार हळबे यांनी आघाडी घेत रविंद्र चव्हाण यांना घाम फोडला होता. परंतु नंतरच्या फेऱ्यात रविंद्र चव्हाण यांनी बाजी मारुन पुन्हा एकदा डोंबिवलीची सत्ता आपल्याकडे राखली. 2019 च्या निवडणुकीत संघाचा संपूर्ण पाठींबा आणि पक्षाची ताकद रविंद्र चव्हाण यांच्या मागे असतानाही मंदार हळबे यांनी घेतलेली 44 हजार 916 मतं ही चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर मंदार हळबे हे अधिकृतरित्या भाजपमध्ये दाखल झाले, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना संधी द्यावी अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचं समोर येत आहे.

संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवू - 

या सर्व चर्चांवर NDTV मराठीने इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. रविंद्र चव्हाण यांच्या नावाला डोंबिवलीत विरोध होत असून ब्राह्मण उमेदवार दिला जावा अशी मागणी केली जात असल्याची गोष्ट खरी असली तरीही ही मागणी कोणी केली आहे हे पहावं लागेल. भाजप किंवा संघाच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाला ही बाब सांगितली आहे...आणि त्यावर वरिष्ठ नेतृत्वाचा काय निर्णय आहे त्यावर अनेक गोष्टी ठरतील. 

त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत लक्षात घेऊन भाजपने यंदा डोंबिवलीत उमेदवार बदलला तर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडण्यासाठी 3-4 इच्छुक उमेदवार तयार असल्याचं चित्र पहायला मिळतंय.

राजकीय पातळीवर काय सुरु आहेत घडामोडी?

स्थानिक पातळीवर रविंद्र चव्हाण यांच्या नावाला विरोध होत असला तरीही राज्य पातळीवरचं भाजपचं नेतृत्व हे रविंद्र चव्हाण यांचं तिकीट कापेल असं चित्र आतातरी दिसत नाहीये. कॅबिनेट मंत्री असलेल्या रविंद्र चव्हाणांवर पक्षाने यंदा कोकणाची जबाबदारी टाकली होती. रत्नागिरी-सिंधुदूर्ग सह रायगड पट्ट्यातही रविंद्र चव्हाणांनी चांगली कामगिरी करुन दाखवत महायुतीला लोकसभेत अपेक्षित निकाल मिळवून दिला आहे. त्यामुळे आतापर्यंतचा त्यांचा अनुभव, कोकणातलं तयार केलेलं नेटवर्क आणि आगामी विधानसभेत महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन करण्याचं भाजपचं ध्येय लक्षात घेता रविंद्र चव्हाण यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चव्हाणांना पुन्हा संधी दिली तरीही लढत सोपी नसेल -

रविंद्र चव्हाण यांना भाजपने पुन्हा संधी दिली तरीही यंदाची निवडणूक त्यांना निश्चीतच सोपी जाणार नाही. याला कारण आहे डोंबिवली आणि नजिकच्या पट्ट्यात शिवसेनेची असलेली ताकद. सध्या शिंदे सेनेत असलेल्या दिपेश म्हात्रे यांनी 2014 साली रविंद्र चव्हाणांविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी म्हात्रे यांनी 37 हजारांच्या घरात मतं घेतली होती.

स्थानिक पातळीवरच्या राजकारणात म्हात्रे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात फारसं सख्य नाही. काही दिवसांपूर्वीच रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी शिवसेनेने केलेली बॅनरबाजी ही त्याचंच द्योतक होती. संघातील नाराज गटाप्रमाणे शिवसेनेतील काही नेत्यांचा रविंद्र चव्हाण यांना विरोध आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटातील दिपेश म्हात्रे हे उबाठा गटाची वाट पकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

त्यातही पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधाला डावलून भाजपने रविंद्र चव्हाण यांनाच पुन्हा संधी दिली तर नाराज गट मतदानावेळी वेगळा विचार करण्याचीही चर्चा सध्या डोंबिवलीत बोलून दाखवली जात आहे.

ऊबाठा गटाकडूनही यंदा डोंबिवलीकडे विशेष लक्ष -

भाजपसोबत उबाठा सेनेनेही यंदा डोंबिवली मतदारसंघ जिंकण्याची तयारी केल्याचं कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार उबाठा गटातील नेत्यांनी, भाजपकडून इच्छुक असलेल्या ब्राह्मण उमेदवारांपैकी एका उमेदवाराला आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचं कळतंय. 

हे राजकीय गणित जुळून न आल्यास भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी लक्षात घेत उबाठा गटाने आणखी एका उमेदवारावर आपली भिस्त ठेवली आहे. स्वच्छ प्रतिमा, सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका उमेदवाराला संघातील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी उबाठा गट प्रयत्नशील असल्याचं कळतंय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संघातील नाराज गटानेही उबाठा गटाच्या या प्रस्तावावर सकारात्मक संकेत दिल्याचं कळतंय.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तयार झालेली ही राजकीय कोंडी रविंद्र चव्हाण फोडणार की नाही हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
विधानसभेत प्रश्न विचारण्यात काँग्रेसचा 'हा' आमदार अव्वल, आदित्य ठाकरेंचा नंबर कितवा?
Assembly Election 2024 : ब्राह्मण उमेदवाराची मागणी, संघाचा विरोध; डोंबिवलीचा गड रविंद्र चव्हाण कसा राखणार?
gunratna-sadavarte-will-contest-elections-against-aaditya-thackeray-in-worli-vidhansabha-constituency
Next Article
गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री! आदित्य ठाकरेंविरोधात लढणार निवडणूक