Hindi Language Controversy : पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती हा या मुद्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या विषयावर सातत्यानं आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी या विषयावर आज (गुरुवार 26 जून) मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी विरोधाच्या राजकारणात आघाडी घेतलीय. त्याचवेळी त्यांचे भाऊ उद्धव ठाकरे यांनीही या विषयावर आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना टाळी देण्याच्या मुद्यावरुन चर्चेत असलेले ठाकरे बंधू या एकाच विषयावर दोन आंदोलनं करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता राज ठाकरे यांच्या मोर्च्यात उद्धव ठाकरे सहभागी होणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे काय म्हणाले?
पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्याला राज ठाकरे सुरुवातीपासून आक्रमक आहेत. त्याचवेळी त्यांनी या विषयावर येत्या 5 जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. हा मराठी माणसांचा मोर्चा असेल.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार अडचणीत आलेले आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्याला राजकीय नेते साहित्यिक कलावंत यांनी विरोध सुरू केलेला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका या हिंदी सक्तीच्या विरोधात घेतलेली आहे. आणि हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी मोर्चाचं आयोजनही केलेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल..सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.
( नक्की वाचा : Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश )
'शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते..हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल,' असंही राज यांनी सांगितलं.
राज यांनी सुरुवातीला या मोर्चाची तारीख 6 जुलै जाहीर केली. पण नंतर काही तासांंमध्येच त्यांनी तारीख बदलली आणि 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यानं मोर्चाची तारीख बदलल्याचं मनसेनं जाहीर केलं.
उद्धव ठाकरेंची उडी
गेल्या दोन महिन्यांहून जास्त काळ मराठी अभ्यास केंद्र आणि अन्य संघटना तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून या संघटनेच्या प्रतिनिधींनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या 7 जुलैला होणाऱ्या मोर्चाचे निमंत्रण दिले. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहे.
( नक्की वाचा : BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा )
मनसेकडून टाळीचा प्रयत्न
मराठी भाषेचा आग्रह आणि हिंदी भाषेला विरोध हा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षाच्या राजकीय चळवळीचा गाभा आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचं महत्त्वही मोठं आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूनी या एकाच मुद्यावर एकाच दिवशी दोन वेळगळी आंदोलनं करण्याचा निर्णय जाहीर झाला.
मराठी भाषा केंद्राचा मोर्चा 7 जुलै रोजी तर मनसेचा मोर्चा हा 5 जुलै रोजी आहे. एकच मोर्चा व्हावा यासाठी मनसे कडून प्रयत्न सुरू झाले त्यानुसार मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून एकच मोठा मोर्चा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु केलेत. या मोर्चाच्या निमित्तानं दोन्ही पक्ष एकत्र येणार का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज यांच्या मोर्चात उद्धव ठाकरे सामील होणार का? हा आता खरा प्रश्न आहे.