
सागर कुलकर्णी
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघा हा तसा काँग्रेसचा एकेकाळचा गड होता. माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतूले यांचा हा मतदार संघ होता. मात्र 2009 साली मतदार संघ पूनर्रचनेत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांच्या पारड्यात गेला. तेव्हापासून या मतदार संघावर तटकरे यांचा एकहाती अमल आहे. मात्र राष्ट्रवादी बरोबरच शिवसेनेतल्या फुटीनंतर या मतदार संघावर आता काँग्रेसने दावा केला आहे.या मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असाच संघर्ष राहीला आहे. यावेळीही अशीच लढत होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी काँग्रेसने मात्र वेगळी भूमिका मांडत ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणीच केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीत श्रीवर्धन हा मतदार संघ कोणाच्या पारड्यात जातो हे अजून निश्चित नाही. मात्र मतदार संघावर दावे केले जात आहेत. या मतदार संघात सुरूवातीला काँग्रेस विरुद्ध शिवसेने आणि नंतर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा लढती राहील्या आहेत. 2014 साली शिवसेनेचा या मतदार संघातून थोड्या मतांनी पराभव झाला होता. इथे अवधुत तटकरे विजयी झाले होते. शिवसेनेच्या रविंद्र मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र नंतर झालेल्या निवडणुकीत सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी मुसंडी मारत शिवसेना उमेदवार विनोद घोसाळकर यांचा तब्बल 39 हजार मतांनी पराभव केला होता. 2009 साली तत्कालीन शिवसेना आमदार तुकाराम सुर्वे यांचा सुनिल तटकरे यांनी पराभव केला होता. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर काँग्रेसची पाहीजे तेवढी ताकद या मतदार संघात राहीलेली नाही.
ट्रेंडिंग बातमी - 'राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची गरज नाही' आता केंद्रीय मंत्री थेट बोलले
मात्र शिवसेने बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर हा मतदार संघा काँग्रेसला मिळावा यासाठी आता स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. या मतदार संघातून शिवसेनेचा वारंवार पराभव होत आहे. शिवाय या मतदार संघात दलित आणि मुस्लीम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी हा मतदार संघ काँग्रेसला मिळाला अशी मागणी स्थानिक नेते वैभव म्हात्रे यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे. त्या बाबतचे एक निवेदनही त्यांनी पटोले यांना दिले आहे. म्हात्रे हे ओबीसी संघटनेत प्रदेश संघटक म्हणून काम करतात. ते अधं आहेत. त्यामुळे अंध व्यक्तीस प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हा मतदार संघ माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतूलेंचा मतदार संघ आहे. मुळ काँग्रेसचा हा मतदार संघ आहे. त्यामुळे तो आता काँग्रेसला परत मिळाला अशी त्यांनी मागणी केली आहे. मात्र शिवसेनेकडेही सध्या तगडे उमेदवार या मतदार संघात आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडेल याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाने अनिल नवगणे यांना तयारी करायचे आदेश दिले आहेत. तर सुनिल तटकरे यांचे जेष्ठ बंधू अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचाही दावा या मतदार संघावर असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world