
अक्षय कुडकेलवार
राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी बाबत आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. राज्यातील सगळ्या निवडणुका महायुतीने एकत्रच लढल्या पाहिजे असा सूर समन्वय समितीच्या सर्वच सदस्यांचा होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. महायुतीत एकत्र लढले तर इच्छुकांची संख्या जास्त आणि वाट्याला येणाऱ्या जागा तुलनेने फारच कमी अशी परिस्थिती ओढवणार आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या माध्यमातून आपले प्राबल्य असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी केली जात होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली अशा ठिकाणी शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल असं बोललं जात होतं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं मत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे. नुकतीच रायगड जिल्हा शिवसेना आढावा बैठक झाली. त्यात हा ठरावही करण्यात आला.
या सगळ्या बातम्या समोर येऊ लागल्याने महायुतीत बिघाडी निर्माण होऊ नये याचा ही विचार केला गेला. शिवाय वेगवेगळे लढल्यास महायुतीलाच फटक बसू शकतो. त्यामुळे एकत्र लढलं पाहीजे असं ही मत काहींनी या बैठकीत व्यक्त केले आहे. एकीकडे समन्वय समिती एकत्र निवडणुका लढण्याच्या मानसिकतेत असली तरी, अनेक ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये टोकाचे वाद आहेत.
यासोबतच तळागाळात आपली ताकद टिकवून ठेवायची असेल तर लोकशाही प्रक्रियेत आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला सहभागी करून घेणं हे प्रत्येक पक्षाला गरजेचे आहे. त्यामुळे महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना एकत्रित सामोर गेली तर मोठ्या प्रमाणात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बंडाळीला देखील महायुतीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय खुला ठेवला जावू शकतो. त्यातून आपापल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जावू शकते अशी ही शक्यता नाकारता येत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world