
देवा राखुंडे
Malegaon Sugar Factory Election 2025: माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर (Malegaon Sugar Factory) वर्चस्व कोणाचे याचा फैसला बुधवारी सकाळपर्यंत झालेला असेल. या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचे मतदान 22 जून रोजी म्हणजेच रविवारी पार पडले होते. मंगळवारी म्हणजेच 24 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती लागला आहे. 'ब' वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन या मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघात एकूण 101 मते होती ज्यातील 91 मते अजित पवारांनी मिळवली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भालचंद्र देवकाते यांना अवघी 10 मते मिळाली.
(नक्की वाचा: मतमोजणीचे आणि निकालाचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा)
अजित पवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे ?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी अजित पवार स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2015 साली या कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. 2020 च्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी अजित पवारांचे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहे.
(नक्की वाचा:माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार जिंकणार का पडणार ?)
कपबशी किटलीवर भारी पडली
बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळपासून सुरूवात झाली. सकाळी नऊ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये 'ब'वर्ग प्रतिनिधी म्हणून कपबशी चिन्हावर लढणाऱ्या अजित पवारांचा विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भालचंद्र देवकाते यांचे निवडणूक चिन्ह किटली होतं. किटलीवर कपबशी भारी पडल्याचे यातून दिसून आले आहे.
बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीळकंठेश्वर पॅनेल (Nilkantheshwar Panel), शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल (Baliraja Sahakar Bachao Panel), या कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजप नेते चंद्रकांत तावरे आणि रंजन तावरे यांचे (Sahkar Bachao Shetkari Panel) आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल अशी चौरंगी लढत होत आहे. मात्र मुख्य लढत ही नीळकंठेश्वर आणि बळीराजा सहकार बचाव पॅनेलमध्ये होणार अशी सुरूवातीपासून चिन्हे दिसत होते. 21 संचालक पदांसाठी 90 उमेदवार रिंगणात असून, या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीची पहिली फेरी मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत संपेल अशी शक्यता असून, मतमोजणीची दुसरी फेरी रात्री 10 वाजल्यानंतर सुरू होईल. मतमोजणीची प्रक्रिया बुधवारी पहाटेपर्यंत सुरू राहण्याची दाट शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world