जाहिरात
Story ProgressBack

'राजीव गांधींचं पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू काँग्रेसमध्ये बेदखल'

Read Time: 3 min
'राजीव गांधींचं पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू काँग्रेसमध्ये बेदखल'
मुंबई:

राज्यात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना महाविकास आघाडीने आपलं जागावाटप जाहीर केलं. सांगलीच्या जागेवर शिवसेना उबाठा पक्षाने आपला दावा सांगत थेट उमेदवारीही जाहीर केली. परंतु शिवसेनेचा हा पवित्रा स्थानिक काँग्रेस नेत्यांना पटला नाही. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक होते. परंतु शिवसेनेने अखेरपर्यंत माघार न घेतल्यामुळे काँग्रेसला सांगलीची जागा सोडावी लागली.

महाविकास आघाडीचा अधिकृत निर्णय जाहीर झाला असला तरीही सांगलीत विशाल पाटील यांनी अखेरपर्यंत लढत द्यायचं ठरवलं आहे. महत्वाची बाब म्हणजे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक काँग्रेस नेते आणि आमदार हे शेवटपर्यंत प्रयत्न करण्याच्या पवित्र्यात आहेत. याचाच एक भाग म्हणून विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत...पर्याय चाचपणी केली.

सांगली-मिरजेत काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं, अनेकांचा राजीनामा -

विशाल पाटील यांना काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांचा राग इतका अनावर झाला होता की त्यांनी स्थानिक प्रदेश काँग्रेस कार्यालयातील काँग्रेस हा शब्दच रंगाने मिटवून टाकला. सांगलीत काँग्रेसच्या या परिस्थितीबद्दल ज्येष्ठ लेखक आणि इतिहासकार विश्वास पाटील यांनी आपल्या भावना फेसबूकवर मांडल्या आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं बोफोर्स घोटाळ्यात पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादा पाटील यांचा नातू काँग्रेसमध्ये बेदलखल झाल्याचं विश्वास पाटील यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

बोफोर्स घोटाळ्यामुळे राजीव गांधींच्या पंतप्रधानपदावर आली होती टाच -

1987 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सच्या तोफा खरेदीतील भ्रष्टाचाराचे मोठे वादळ  घोंगावत आले होते. त्याचे स्वरूप इतके विराट होते की, कोणत्याही क्षणी राजीव  गांधींना राजीनामा द्यावा लागणार होता. काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात प्रचंड खदखद होती. त्यावेळी ग्यानी  झेलसिंग हे राष्ट्रपती होते. त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे बोपोर्सचे डॉक्युमेंट्स अवलोकन करण्यासाठी मागितले होते.  जे भारत सरकारने त्यांना अजिबात दिले नाहीत. त्यावेळी राजीव गांधींचे सरकारच बरखास्त करायचे राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी मनोमन ठरविले होते, हा इतिहास आहे..असं विश्वास पाटील यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

वसंतदादांच्या मध्यस्थीमुळे वाचलं राजीव गांधींचं पंतप्रधानपद -

विश्वास पाटील पुढे आपल्या लेखात म्हणतात, बोफर्सच्या त्या वादळात राजीव गांधींना पंतप्रधानपदावरून  हटविण्यासाठी ग्यानी झेलसिंग इतके पेटून उठले होते की, त्यांनी काँग्रेस अंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. राजीवजींच्या ठिकाणी व्यंकटरमण किंवा पी. व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधान बनवायचे त्यांनी नक्की ठरवले होते. मात्र ऐनवेळी नरसिंहराव यांनी माघार घेतली.  “एवढे मोठे बंड करायचे तर माझ्या ऐवजी ग्यानीजी आपण वसंतदादांचा विचार करा.  ते स्वतंत्रता सेनानी आहेत.  त्यांचा देशातला लोकसंग्रह माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे” असा सल्ला नरसिंहरावांनी ग्यानी झेलसिंग यांना  दिला. तेव्हा  राष्ट्रपती ग्यानीजीनी वसंतदादांना  जयपूरहून तातडीने बोलावून घेतले. पक्षाला आणि राष्ट्राला आपल्या नेतृत्वाची गरज कशी आहे हे पटवून सांगितले.

अवश्य वाचा - सांगलीत काँग्रेसमध्ये ठिणगी, तालुका समिती केली बरखास्त

परंतु रक्तात आणि हाडामासांत काँग्रेस भिनलेल्या वसंतदादांनी काहीही न बोलता कृतीमधून ती ऑफर धुडकावली. ते तडक राष्ट्रपती भवनातून राजीव गांधी यांच्या निवासस्थानी गेले. त्यांनी “राजीवजी आपका सिंगासन खतरे मे है” असे सांगितलेच. शिवाय काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभावित बंडामध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती राजीव गांधींना दिली. दादांच्या नकारानंतर पक्षातील संभावित बंड शमले. हळूहळू बोफर्सचे वादळही शांत होत गेले.. ग्यानी झेलसिंग यांचा कार्यकाल सुद्धा लवकरच संपला. राजीवजीनी त्याना  राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म दिली नाही. त्यांनी मागितलीही नाही.

अवश्य वाचा - विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

एकीकडे शिवसेना उबाठा गटाने सांगलीच्या जागेवरचा आपला दावा सोडण्यास नकार दिला आहे. काँग्रेसची जागा शाहु छत्रपतींसाठी सोडल्यानंतर त्याच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली. सुरुवातीला बाळासाहेब थोरात, नाना पटोले यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही शिवसेनेच्या या कृतीविरोधात नाराजी व्यक्त केली. परंतु सरतेशेवटी काँग्रेस नेतृत्वाला माघार घ्यावीच लागली. त्यामुळे विशाल पाटील आता आगामी निवडणुकीत काय पवित्रा घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination