
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ पाहात या पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. पाच पैकी तीन जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. मात्र अजित पवारांच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती आहे. त्यामुळे कुणाला संधी द्यायची ही डोकेदुखी आता पक्षनेतृत्वा समोर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या एका जागेसाठी सर्वात आघाडीवर जर कुणाचे नाव असेल तर ते संग्राम कोते पाटील यांचे आहे. संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहीले आहेत. त्यांनी युवक प्रदेशाध्यक्षपदाची ही जबाबदारी स्वीकारली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर होती त्यावेळी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लाखो युवकांना रस्त्यावर उतरवले होते. 2014 ते 2019 याकाळात त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढत साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता. 124 मोर्चे त्यांनी काढले. आपण केलेल्या या कार्याची दखल अजित पवार घेतील अशी अपेक्षा ही संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे संग्राम कोते पाटील यांचे मामा आहेत. थोरातांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये संधी असतानाही कोते पाटील यांनी अजित पवारांनाच साथ दिली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवारांबरोबरच राहीले. त्यामुळे विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर त्यांना दावा केला आहे. कोते पाटील यांच्या प्रमाणेच झीशान सिद्दिकी आणि आनंद परांजपे यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे. झीशान हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आहेत. ते मुळचे राष्ट्रवादीचे नाहीत त्यामुळे ते या स्पर्धेतून काही मागे पडतील अशी चर्चा आहे. तर आनंद परांजपे यांचा नेत्यांच्या भोवती चांगला वावर असतो. शिवाय ठाण्यात आव्हाडांना आव्हान देण्यासाठी परांजपेंना ताकद दिली जाते का हे ही पाहावे लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत संग्राम कोते पाटील यांचे पारडे जड दिसत आहे, अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.
विधान परिषदेवर असलेल्या प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर हे भाजपचे सदस्य विधानसभेत निवडून गेले आहेत. तर राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे गट ) हे दोघेही विधानसभेवर निवडून आले आहेत. हे पाचही जण विधानसभेवर निवडून गेल्या मुळे त्यांची विधान परिषदेतील आमदारकी आपोआप संपुष्टात आली आहे. पाच पैकी तीन जागा या भाजपच्या आहेत. तर एक एक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची आहे. त्यामुळे या जागांवर वर्णी लागावी यासाठी आतापासूनच जोरदार लॉबिंग केली जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
दरम्यान या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. विधानसभेत महायुतीचे 237 ऐवढ्या आमदारांचे प्रचंड संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे पाचही आमदार निवडून येण्यास कुठलीही अडचण नाही. पाचपैकी तीन जागा या पुढील वर्षी मे महिन्यात रिक्त होणार आहेत. तर बाकीत्या दोनपैकी एक जागा 2030 पर्यंत आहे. तर दुसरी जागा 2028 पर्यंत आहे. यातील तिघांना वर्षभरापुरतीच आमदारकी मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world