आगामी विधानसभा निवडणुकीची तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. त्यात आता वंचित बहुजन आघाडी आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेसाठी चांगली बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांना विधानसभेसाठी निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. त्याबाबचे पत्रही जारी करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना राज्यातल्या 288 मतदार संघात एका चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे. या आधी प्रत्येक मतदार संघात वेगवेगळ्या चिन्हावर या पक्षांना निवडणूक लढावी लागली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वंचितला मिळाले नवे चिन्ह
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचितला केंद्रीय निवडणूक आयोगने नवे चिन्ह बहाल केले आहे. त्यानुसार वंचितला गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात आले आहे. त्याबाबत आयोगाने एक पत्रक काढून हे जाहीर केले आहे. वंचितला या आधी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. कधी कप बशी तर कधी गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. मात्र यावेळी तसे होणार नाही. वंचित ज्या मतदार संघात आपले उमेदवार उभे करेल त्यांना सिलेंडर हे चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे चिन्हा बाबतचा वंचितचा प्रश्न सुटणार आहे.
बच्चू कडूंनाही चिन्ह मिळाले
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला ही नवे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. प्रहार संघटनेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता बॅट या चिन्हावर लढता येणार आहे. हे चिन्ह आयोगाने प्रहार संघटनेला देवू केले आहे. प्रहार संघटनाही या आधी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढली आहे. मात्र यावेळी स्थिती बदलणार आहे. बच्चू कडू यांनी विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय तिसऱ्या आघाडीचीही त्यांनी तयारी सुरू केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?
प्रकाश आंबेडकरांची जोरदार तयारी
वंचितच्या माध्यमातून राज्यभर आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन केले होते. त्यामाध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. आता त्यांच्या पक्षाला एक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला आणखी धार येण्याची दाट शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचितला वेगवेगळ्या चिन्हावर लढावे लागले होते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितची कामगिरी तेवढी चांगली झाली नव्हती. त्यामुळे विधानसभेत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान वंचित समोर आहे.
सिलेंडरमुळे कोण गॅसवर जाणार?
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितने चांगली मते मिळवली होती. त्याचा बऱ्यापैकी फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला होता. काँग्रेस आघाडी सत्तेपासून वंचित राहीली होती. मात्र ही कामगिरी 2024 च्या निवडणुकीत वंचितला करता आली नाही. महाविकास आघाडीने लोकसभेला घवघवीत यश मिळवलं. काही जागा वंचितमुळे आघाडीच्या हातून गेल्या हे सत्य आहे. आता विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत वंचित कोणाला दणका देणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world