लोकसभा निवडणुकीत महायुतीचा राज्यात दारूण पराभव झाला.त्यानंतर दिल्लीतून सुत्र हलली.मित्र पक्षांना एकत्र घेवून विधानसभा निवडणुकीला सामोर जा अशा सुचना भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाला देण्यात आल्या.त्यामुळे आता सर्व काही ठिक होईल असा सुर लावला जात होता. मात्र हा सुर आता शिवसेना नेते रामदास कदम यांच्या धक्कादायक आरोपांनी बिघडण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदम यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर धक्कादायक आरोप केले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'लोकसभेला भाजपचा कटू अनूभव'
रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत कटू अनुभव आल्याचे रामदास कदम म्हणाले. शिवसेना भाजपची युती जवळपास 30 वर्षाची आहे. त्यामुळे सर्व काही तुम्हालाच समजते आणि आम्हाला काहीच समजत नाही असे समजू नका असा इशाराही कदम यांनी दिला. लोकसभेसाठी शिवसेनेला 15 जागा देण्यात आल्या. त्याही शेवटपर्यंत लटकवून ठेवण्यात आल्या. प्रत्येक जागेवर भाजपनेच हक्क सांगितला. त्याचा फटका शिवसेनेला बसला. जर या जागा वेळीच जाहीर झाल्या असत्या तर शिवसेनेनं 12 ते 13 जागा जिंकल्या असत्या. भाजपने आडकाठी आणल्यामुळे या जागा हरल्या असा थेट आरोप कदम यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं जाणार?
'शिंदेंच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला'
मोदींसाठी एक-एक जागा महत्वाची होती. अशा वेळी भाजपच्या नेत्यांनी संयम पाळायला पाहीजे होता. युती होती तर एकत्रीत जागांची घोषणा व्हायला पाहीजे होती. मात्र शिंदेंच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला गेला आहे की काय? असा प्रश्न आता पडतोय. असे वक्तव्य करून कदम यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ठाणे कल्याणच्या जागेवरही भाजपने दावा केला होता. कल्याणची जागा तर फडणवीसांना जाहीर करावी लागली ही वेळ का आली याचाही विचार झाला पाहीजे असेही कदम म्हणाले.
शिवसेनेला संपवण्याचा डाव?
लोकसभा निवडणुकीत भाजपने सगळं आमचं, आम्हालाचा द्या.अशी भूमीका राहील्याचे कदम म्हणाले. यातून भाजपची तुम्हाला संपवायचं आहे ही निती चुकीची आहे असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व एका विश्वासाने तुमच्या बरोबर आलो आहोत.पण आम्हालाच अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला. स्वत:मोठे व्हायचे आणि शिवसेनेला संपवायचे हीच भूमीका भाजपची राहीली आहे. लोकसभेत जे घडले ते विधानसभेत होणार नाही याची काळजी घ्या असेही कदम यांनी भाजपला सुनावले आहे.
तुमचा सर्वे कुठे गेला?
लोकसभेसाठी शिवसेनेच्या जागांचा सर्वे भाजपने केला. जागा कापल्या गेल्या. काही ठिकाणी उमेदवार बदलायला सांगितले. काही ठिकाणी उमदेवार उशिरा जाहीर केले गेले. त्याचा फटका शिवसेनेला बसला.आता लोकसभेचा निकाल लागला आहे. तुमचे उमेदवार पडले आहे. मग आता तुमचा सर्वे कुठे गेला अशा शब्दात कदम यांनी भाजपला जाब विचारला आहे.सर्वेच्या नावाखाली अस्थिरता निर्माण केली गेली. मोदींचे नुकसान करण्याचे पाप भाजपच्याच मंडळींनी केले असा गंभीर आरोपही कदम यांनी केला.
'सर्वात जास्त त्रास भाजपचाच'
शिवसेना भाजपची युती आहे. मात्र दापोली या माझ्याच मतदार संघात सर्वात जास्त त्रास हा भाजपचाच आहे असा आरोपही कदम यांनी केला आहे. स्थानिक आमदाराचे खच्चीकरण भाजप करत आहे. मंत्री रविंद्र चव्हाण त्याला जबाबदार आहेत. त्यांची लेखी तक्रार मोदी आणि शहांकडे आपण करणार असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले. त्यांची तक्रार या आधीही फडणवीसांकडे केली आहे. पण करतो बघतो अशी उत्तरे आली आहे. ते ऐकत नसतील तर त्यांना मंत्रीपदावरून हटवा. अशी मागणीच कदम यांनी केली आहे. ते मंत्री आमच्या मुळे आहेत. जर आम्ही बंड केले नसते तर ते मंत्री झाले नसते अशा शब्दात कदम यांनी सुनावले आहे.
'विधानसभेच्या 100 जागा लढणार'
लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत केली आहे. आता विधानसभेला तुम्ही आम्हाला मदत करा.असे रामदास कदम म्हणाले. शिवसेनाला 100 ते 110 जागा मिळाल्याच पाहीजेत. त्यावर आम्ही ठाम आहोत.त्यासाठी वरच्या लेवलला बोला. जागा वाटप लवकरात लवकर करा असेही कदम म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world