
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. पण त्यांचा विरोध झुगारून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिकमध्ये स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजर यांची भाजपमध्ये एन्ट्री होणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवकही त्यांच्या बरोबर प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत सुधाकर बडगुजर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं ही समजत आहे. संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून बडगुजर यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून त्यांची हाकालपट्टी करण्यात आली होती.
सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटाला सोडचिट्टी देणार याची चर्चा सुरू झाली. त्यातच ते पक्ष सोडण्या आधी त्यांचीच पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली. मात्र ते भाजपमध्ये येणार असं म्हटल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला. आमदार सीमा हिरे यांनी यावेळी सांगितलं की, बडगुजर विरोधात मी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांनी विखारी प्रचार करत, कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परदेशात कॅसिनो खेळल्याचे कथित फोटो बडगुजर यांनीच मीडियाला दिले.
नारायण राणे यांना जेवण करताना अटक करण्यात आली होती. त्याचे तक्रारदार बडगुजर होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबतचा बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बडगुजरच्या मुलाने एकावर गोळीबार केला. त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे लपवण्यासाठी भाजपामध्ये येत असतील, असा आरोप ही हिरे यांनी केला होता. महापालिकेत आर्थिक व्यवहार होत नाही तोपर्यन्त बडगुजर टेंडर देत नाहीत. त्यांच्याच पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. आमची खात्री आहे की वरिष्ठ सर्व विचार करतील. बडगुजर यांना घेताना 10 वेळा पक्ष विचार करेल असं ही हिरे म्हणाल्या होत्या. पण त्याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचं आता स्पष्ट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world