जाहिरात

Sindhudurg News: सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे! जिल्हा परिषद निवडणुकीत सख्खे भाऊच आमनेसामने

Sindhudurg ZP Election: राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती असली तरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राणे बंधू थेट आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र आहे

Sindhudurg News: सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे! जिल्हा परिषद निवडणुकीत सख्खे भाऊच आमनेसामने
Sindhudurg ZP Election: सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेल्या या राजकीय संघर्षामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबई:

गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी

Sindhudurg ZP Election: राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती असली तरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राणे बंधू थेट आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यात 'स्वबळावर' लढण्याचा नारा दिला आहे, तर त्यांचे बंधू, भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी येथे 'मैत्रीपूर्ण लढत' होईल, असे जाहीर केले आहे. सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेल्या या राजकीय संघर्षामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे.

निलेश राणेंचा 'स्वबळा'चा एल्गार

शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी पावशी विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले की, 'सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.'

'मतदारसंघात कामं आम्ही केली असं अनेकजण सांगतील. पण जी कामं झाली ती आमच्या माध्यमातून झाल्याचं ठणकावून सांगा. कारण इथला आमदार शिवसेनेचा आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितले. या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तारुढ शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार की नाही, याबद्दलचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

( नक्की वाचा : Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र )
 

नितेश राणेंकडून 'मैत्रीपूर्ण लढती'ची घोषणा

दुसरीकडे, भाजपचे नेते व मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात 'मैत्रीपूर्ण लढत' होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या लढतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

याचवेळी, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यालाही नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उदय सामंत यांनी 'कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाणाची ताकद दाखवावीच लागेल,' असे म्हटले होते. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, 'उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी.'

महायुतीतच आव्हान-प्रतिआव्हान

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्ता राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद वाढवली आहे.


त्याचप्रमाणे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही 'स्थानिक विकास आणि जनतेचा विश्वास' या घोषवाक्यासह निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आमदार दीपक केसरकर आणि मनिष दळवी यांच्यासह अन्य स्थानिक नेते यासाठी सक्रिय झाले आहेत.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र काम करत असले तरी, सिंधुदुर्गात मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. हे दावे-प्रतिदावे मतदारांनाही बुचकळ्यात टाकत आहेत.

त्याचबरोबर निलेश राणे आणि नितेश राणे या दोन सख्ख्या भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील ही 'मैत्रीपूर्ण लढत' सत्तेचा सोपान गाठणार की संघर्ष अधिक वाढवणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com