Thane MNS Leader Mahesh Ingale Video : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच मनसेचे ठाणे शहर प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांच्या एका व्हिडीओनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सीमा महेश इंगळे यांचे पती महेश इंगळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजप उमेदवाराने पैशांची ऑफर केल्याचा आरोप इंगळे यांनी केला आहे.
महेश इंगळे यांनी म्हटलंय की, त्यांच्या पत्नी सीमा महेश इंगळे या प्रभाग क्रमांक 11 (क),निशाणी रेल्वे इंजिन या चिन्हावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनसेतर्फे ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. या प्रभागात भाजपचे उमेदवार असलेल्या व्यक्तीच्या दीराने महेश इंगळे यांना पैशाचे आमिष दाखवून पत्नीची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे.त्यांनी फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करत हा गंभीर आरोप केला आहे.
विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही !
— Mahesh Ingale (@MaheshI82785078) January 12, 2026
माझी पत्नी सौ सीमा महेश इंगळे, वॉर्ड क्रमांक 11 क ,निशाणी रेल्वे इंजिन
महाविकास आघाडी.उमेदवार.
ठा.म.पा.इलेक्शन लढत असून.विरोधी उमेदवार 11 क भाजपा.यांच्या दीराने मला आमिष दाखवून उमेदवारी नामांकन मागे घ्यावे म्हणुन प्रयत्न केले.
महेश इंगळे नेमकं काय म्हणाले?
"मी गेले 18-19 वर्षे प्रभागात विविध उपक्रम राबवत आहे.विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आहे. यावेळी ठाणे महापालिका निवडणुकीत आमच्या वॉर्डमध्ये लेडीज वॉर्ड झाल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, अविनाश जाधव,अभिजीत पानसे साहेब यांच्या आशिवार्दाने माझी पत्नी सीमा महेश इंगळेला तिचं काम बघून महाविकास आघाडीतर्फे तिकीट देण्यात आलं.प्रभाग 11 क मधून तिला तिकीट देण्यात आलं. तिने नामांकन अर्ज दाखल केला.त्यानंतर नामांकन अर्ज मागे घेण्याची जी तारीख होती, त्याच्या एक दिवस आधी विरोधी गटातील उमेदवार (11 क) मधून नंदा कृष्णा पाटील यांचे दीर सचिन पाटील यांच्यामार्फत मला दिवसभर फोन कॉल्स आले.
पण मी त्यांचे फोन रिसिव्ह नाही केले. त्यानंतर रात्री मी एका ठिकाणाहून मिटिंग करून परत येत असताना,त्यांनी माझ्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी मला थांबवलं आणि ते म्हणाले, माझ्या वहिनीला बिनविरोध निवडून आणायचं आहे. तू नामांकन अर्ज मागे घे. तू सेटल होशील. तुला सेटल करू, असं आमिष दाखवलं. मी त्यांना सरळ सांगितलं, विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही आहे. माझ्या रक्तात गद्दारी नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world