
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायला पाहीजे होतं. पण त्यावेळी माझं ऐकलं असतं तर आताची वेळ आली नसती असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या मंत्र्यांनीच केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे भाजप बरोबर असायला हवे होते असेही ते म्हणाले आहेत. या सर्व गोंधळात अडीच वर्ष सोडा पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच मिळाले असंही या मंत्र्यानं म्हटलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळाले होते. पण त्यावेळी शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र ही मागणी भाजप नेतृत्वाने धुडकावली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. त्या आधी भाजप आणि शिवसेनेनं अडीच- अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे असा प्रस्ताव आपण दिला होता असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. त्या शिवाय भाजपने तीन वर्ष आणि शिवसेनेनं दोन वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावे असा तोडगाही सुचवला होता.
ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून वाद चव्हाट्यावर, थेट शरद पवारांची मध्यस्थी
पण त्यावेळी भाजपने आपला हा सल्ला ऐकला नाही. आपण दिलेला सल्ला जर त्यावेळी भाजपने ऐकला असता तर ही वेळ आता आली नसती अशा शब्दात आठवले यांनी भाजपला सुनावले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या नादात पाचही वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळाले असेही ते म्हणाले. पहिले अडीच वर्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी अडीच वर्ष शिंदेंच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले असं सांगत त्यांनी भाजपला अलगद चिमटा काढला. पण आपलं ऐकलं असतं तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजपलाही मिळालं असतं असे आठवले म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले' बड्या नेत्याचा बडा आरोप
उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी दिलेल्या प्रस्तावाचा विचार भाजपने करायला हवा होता. उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर असायला हवे होते. उद्धव ठाकरे हे एनडीए बरोबर राहीले असते तर शिवसेना आणि धनुष्यबाणही त्यांच्या बरोबर राहीले असते असेही आठवले यावेळी म्हणाले. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुती भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाईल असे ते म्हणाले. पण यावेळी त्यांनी भाजपने त्यावेळी आपले ऐकले पाहीजे होते हे आवर्जून सांगितले.
यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बद्दलही मत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीने थोडं लवचिक धोरण घेणे गरजेचे आहे. त्यांना 2014 साली मतं मिळाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्व जागा लढल्या पण जिंकल्या एकही नाही त्याचा उपयोग काय असा प्रश्नही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी एनडीए बरोबर यावे अशी ऑफरही त्यांनी दिली. तसे झाल्यास माझे मंत्रीपद त्यांना देण्याची शिफारस आपण करू असेही आठवले यावेळी म्हणाले. आपल्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत नसताना आपण केंद्रात मंत्री आहोत हे त्यांनी आंबेडकरांना बोलून दाखवले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world