मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या सागरी मार्गाचा (कोस्टल रोड) एका टप्प्याचं लोकार्पण झालंय. मरीन ड्राईव्ह ते वरळी या मार्गिका आता खुली करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. तर, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आपण या कामाचा पाठपुरावा करत असताना मोदी सरकारच्याच विभागावर नाराजी व्यक्त केली होती, याचा किस्साही फडणवीस यांनी सांगितला.
काय म्हणाले फडणवीस?
कोस्टल रोडचा पहिला टप्पा हा वरळीपर्यंत सुरु झालाय. वरळीचे आमदार असलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना फडणवीस यांनी नाव न घेता लक्ष्य केलं. 'मला सोशल मीडियावर पाहायला मिळालं की उबाठाचे बाळराजे कोस्टल रोड आम्ही केला असं सांगत आमच्या कामाचं श्रेय घेत आहेत. पहिल्यांदा मी त्यांना सांगतो की, 'आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाहीत.जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. कोस्टल रोडची संकल्पना नवीन नव्हती. उद्धवजींनी मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र झालाच नाही.'
'हात हलवत परत यायचे'
2014 साली केंद्रात मोदी आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यांनंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. आपल्या नियमात सी लिंक बांधण्याची परवानगी होती.पण, कोस्टल रोड बांधण्यास नव्हती. कोस्टल रोड करण्यासाठी रेक्लमेशन करावे लागते. आम्ही रेक्लेमेशन करु तसंच सीआरझेडची लाईन बदलणार नाही, असं अंडरटेकिंग आम्हाला द्यावं लागलं. मोठ्या प्रमाणात बिल्डिंग तयार होण्याच्या भीतीनं परवानगी मिळत नव्हती. मात्र या जमिनीवर उद्यानं, मैदानं याशिवाय एकही बांधकाम करणार नाही, असं सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.
अनेक सन्मानीय मुख्यमंत्री विशेषत:यूपीएचे महाराष्ट्राले शेवटचे मुख्यमंत्री कोस्टल रोडला 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणत दिल्लीला जाताना मी पाहिलंय. ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
फडणवीस झाले होते नाराज
कोस्टल रोडचं काम सुरु असताना त्याला अडथळा आणण्याचं काम मोदी सरकारच्याच कार्यकाळात अधिकाऱ्यांनी केलं होतं, असा किस्साही फडणवीस यांनी यावेळी सांगितला
एका बैठकीत मी नाराज झालो. तुमच्या सरकारप्रमाणे हे डिपार्टमेंट काम करत नाही अशी मोदीजींकडं तक्रार करतो, मी एक मुख्यमंत्री दीड वर्ष चकरा मारतोय, पण रोज नवे अडथळे आणतायत,' असं फडणवीस म्हणाले.
नरेंद्र मोदी सरकारमधील तत्कालीन पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी आजारी असताना कोस्टल रोडची महत्त्वाची बैठक घेतली. त्यांनी कोस्टल रोडचं फायनल नोटिफिकेशन काढलं.हे नोटिफिकेशन काढल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दवे आपल्यात नव्हते. त्यांचं निधन झालं, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली.
शिवसेनेकडून उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडचं श्रेय घेताच शिवसेनेचा उबाठा गट आक्रमक झालाय. 'कोव्हिड काळात या पूलाचं काम ठप्प झालं होतं. उद्धव ठाकरेंनी त्याला प्राधान्य दिलं. ज्यांनी काम केलं त्यांच्यावर टीका केली. कोळी बांधवांचा मुद्दा आम्ही देखील उपस्थित केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जाणीवपूर्वक उद्घाटन केलंय. हा पूल वर्सोवापर्यंत झाला असता तर आम्हाला आनंद झाला असता,' अशी टीका उबाठा गटाचे आमदार सचिन आहिर यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world