ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर या मागणीला ओबीसी समाजाने जोरदार विरोध केला आहे. आरक्षण द्यायचे असेल तर मराठा समाजासाठी वेगळे आरक्षण द्यावे असे ओबीसी समाजाने स्पष्ट केले आहे. या वादात आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. ते आरक्षण बचाव रॅलीही काढणार आहेत. त्यातून ते ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा संदेश देणार आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादात उडी घेतली आहे. त्यांनी आता थेट ओबीसींची बाजू घेतली आहे. यासाठी ते आरक्षण बचाव रॅलीही काढणार आहेत. या रॅलीमध्ये आपण शरद पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांना आमंत्रित केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. जरी मिळाले तरी ते कोर्टात टिकू शकत नाहीत असेही त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवून प्रकाश आंबेडकरांनी एक मोठे वक्तव्यही केले आहे. ते म्हणाले ओबीसी समाजाला जर आपले आरक्षण टिकवायचे असेल तर त्यांच्या समोर एकच पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांचे 100 आमदार निवडून यायला पाहीजेत. त्यातून ताकद दिसून येईल. आंबेडकर यांनी आता ओबीसी, दलित मुस्लिम यांची मोट बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेंडिंग बातमी - तरुणाने अटल सेतूवर गाडी थांबवली, अन् क्षणाचाही विचार न करता केले धक्कादायक कृत्य
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला चांगली कामगिरी करता आली नव्हती. स्वत: प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदार संघातून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीत त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला पाहीजे असे सांगितले होते. शिवाय मनोज जरांगे पाटील यांनाही उमेदवारी द्या असा आग्रह धरला होता. मात्र त्याचा फायदा काही वंचितला झाला नाही. आता आंबेडकर यांनी मराठा ऐवजी ओबीसींकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world