T20 World Cup 2026: टी 20 विश्वचषकादरम्यान टीम इंडियाचा मोठा धक्का बसला आहे. संघाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा याची प्रकृती बिघडल्याने त्याला दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गुरुवारी (12 फेब्रुवारी) होणाऱ्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वीच अभिषेकला अस्वस्थ वाटत होते. अमेरिकेविरुद्ध खेळल्यानंतर त्याची प्रकृती अधिक बिघडली. त्याला तीव्र ताप असल्याने तातडीने 'ड्रिप्स' देण्यात आल्या.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सराव सत्रात अभिषेक सहभागी होऊ शकला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या काही चाचण्या केल्या जात आहेत. सध्या तरी नामिबियाविरुद्ध तो खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे.
वॉशिंग्टन सुंदरची संघात एन्ट्री
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आता भारतीय संघात सामील झाला असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबतही सकारात्मक बातमी असून 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world