हिरो सुरुवातीला भरपूर मार खातो. त्याचा श्वास थांबतो. तो कधीही पाठ टेकणार त्याचा खेळ खल्लास होणार असं वाटू लागतं... आणि अचानक हिरो उभा राहतो. तो समोर येईल त्याला बाजूला करत त्यांना जमिनदोस्त करत लढाई जिंकतो. अनेक हिंदी चित्रपटात हे तुम्ही पाहिलंय. चित्रपट हे फँटसीचंच माध्यम असल्यानं त्यामध्ये हे सहजशक्य आहे. पण, खेळातही एखादी टीम पराभवाच्या खोल दरीतून पुन्हा उभी राहते आणि विजेतेपदाच्या जवळ पोहोचते तेंव्हा त्यांचा प्रवास अचिंबत करणारा असला तरी त्यामागे एक प्रोसेस असते. ही प्रोसेस सामान्य टीमला चॅम्पियन बनवते. आयपीएल 2024 मधील आता 'प्ले ऑफ' चे सामने बाकी आहेत. या टप्प्यातील चार पैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) टीमनं या पद्धतीनं सर्वांना आश्चर्यचकीत करणारा प्रवास केलाय. सलग 6 सामने जिंकत या टीमनं 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केलाय. आरसीबीच्या (RCB) या प्रवासाचं रहस्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी होती परिस्थिती?
आयपीएल 2024 मधील पहिला हाफ आरसीबीसाठी अत्यंत निराशाजनक होता. त्यांनी आठपैकी सात सामने गमावले होते. ग्लेन मॅक्सवेलला फॉर्म नव्हता. सर्वात महागडा खेळाडू कॅमेरुन ग्रीनचा रोल नेमका काय आहे हे निश्चित झालं नव्हतं. विराट कोहलीवर स्ट्राईक रेटच्या मुद्यावर टीका होत होती. त्याच्या 'पॉवर प्ले' नंतरच्या खेळावर प्रश्न विचारले जात होते. रजत पाटीदारचा फॉर्म हरपला होता. फास्ट बॉलर्स महागडे ठरत होते. स्पिनर्स कॉम्बिनिशेन नक्की होत नव्हतं. 'प्ले ऑफ' च्या रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम आरसीबी असेल, याबद्दल अनेकांना खात्री होती.
( नक्की वाचा : विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही? )
विराटचा क्लास
आरसीबीनं 2016 साली आयपीएल फायनल गाठली होती. त्या सिझनमध्ये विराटनं 4 सेंच्युरीसह 973 रन केले होते. विराट त्या रेकॉर्डपासून बराच मागं असला तरी त्यानं त्याच्या क्लास दाखवत टीमच्या यशात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. गेल्या 6 पैकी 3 सामन्यात विराटनं हाफ सेंच्युरी झळकावलीय.
मिडल ऑर्डरचा Fearless खेळ
विराट आणि फाफ ड्यू प्लेसी लवकर आऊट झाले तर आरसीबीकडून रन करण्याची जबाबदारी थेट लोअर ऑर्डरमधील दिनेश कार्तिकवर येत होती. मिडल ऑर्डर फॉर्ममध्ये नसणं हे आरसीबीच्या अपयशाचं एक महत्त्वाचं कारण होतं. रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि विल जॅक्स (Will Jacks) यांनी हे चित्र बदललं.
पाटीदारच्या या सिझनमधील पाचही हाफ सेंच्युरी 30 पेक्षा कमी बॉलमध्ये पूर्ण केल्या आहेत. विल जॅक्सवर दाखवलेला विश्वास आरसीबीसाठी फायदेशीर ठरला. त्यानं गुजरात टायटन्सविरुद्ध राशिद खानची 6, 6, 4, 6, 6 अशी धुलाई करत फक्त 41 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. जॅक्सनं या सिझनमध्ये 175.57 तर पाटीदारनं 179.60 च्या स्ट्राईक रेटनं रन केले आहेत. T20 क्रिकेटला साजेसा त्यांचा Fearless खेळ आरसीबीला 'प्ले ऑफ' मध्ये नेण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
( नक्की वाचा : IPL 2024 : मुलींकडून शिका! RCB च्या महिला टीमपासून पुरुषांनी काय शिकलं पाहिजे? )
बॉलर्सचं पुनरागमन
आरसीबीनं पहिल्या 8 सामन्यात फक्त 34 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतरच्या सहा सामन्यात त्यांनी 48 विकेट्स घेतल्या. पहिल्या सात सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजनं त्यानंतरच्या सात सामन्यात 8 विकेट्स घेतल्या. या कालावधीमध्ये त्यानं फक्त एकदाच 9 पेक्षा जास्त इकोनॉमी रेटनं रन दिले.
आजवर फक्त दोन आयपीएल सामन्यांचा अनुभव असलेल्या स्वप्नील सिंहला टीममध्ये घेण्याचा आरसीबीचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. स्वप्नीलनं पहिल्याच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये मार्कराम आणि क्लासेन या दोघांना आऊट करत त्याचा इम्पॅक्ट सिद्ध केला. आरसीबीनं स्वप्नीलला नंतरच्या चार सामन्यात पहिली ओव्हर दिली. त्यामध्येही त्यानं नियंत्रित बॉलिंग करत त्याचा दर्जा सिद्ध केला.
रिंकू सिंहनं मागच्या सिझनमध्ये सलग 5 सिक्स लगावल्यानं लक्षात राहिलेल्या यश दयालवर आरसीबीनं यंदा विश्वास दाखवला. यशनं चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शेवटची ओव्हर टाकली. त्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर धोनीनं सिक्स लगावला होता. त्यानंतरही त्यानं नंतरच्या चार बॉलमध्ये फक्त 1 रन देत आरसीबीला 'प्ले ऑफ' मध्ये पोहचवलं. सीएसकेविरुद्धच्या शेवटच्या ओव्हरमध्ये यश दयालला नवी ओळख मिळालीय.
( नक्की वाचा : मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो, वाचा कोट्यवधी रुपये घेणाऱ्या खेळाडूचा एक रन-विकेट किती पडली महाग )
पुढचा प्रवास खडतर पण...
आरसीबीचा विजेतेपदाचा पुढील प्रवास देखील सोपा नाहीय. या सिझनमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या तीन टीमचा अडथळा त्यांना पार करायचा आहे. 'प्ले ऑफ' मधील तीन सामने जिंकल्यानंतरच त्यांचे आयपीएल ट्रॉफीला पहिल्यांदा हात लागणार आहेत. आरसीबीकडं आता गमावण्यासारखं काही नाही. त्यांना आता गेल्या सहा सामन्यातील खेळाच्या प्रोसेसेची पुढंही अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे आता दबाव आरसीबीवर नाही तर टॉपच्या तीन टीमवर असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world