जाहिरात
This Article is From Mar 07, 2024

IPL 2024: 2 वेळा जग जिंकणा-या पॅट कमिन्सला आयपीएलचा पेपर का आहे अवघड?

पॅट कमिन्सचं लक्ष्य आगामी टी 20 वर्ल्ड कप आहे. त्यापूर्वी त्याला एक खडतर पेपर द्यायचा आहे.

IPL 2024: 2 वेळा जग जिंकणा-या पॅट कमिन्सला आयपीएलचा पेपर का आहे अवघड?
पॅट कमिन्ससाठी हा अवघड पेपर आहे.
मुंबई:

पॅट कमिन्ससाठी 2023 हे ड्रीम वर्ष ठरले.‌ त्यानं एकाच वर्षात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. आजवर कोणत्याही कॅप्टनला एकाच वर्षात या दोन स्पर्धा जिंकता आलेल्या नाहीत. 

कमिन्सचं लक्ष्य यावर्षी होणारा टी20 वर्ल्ड कप जिंकून आयसीसी विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याचं आहे. पण, त्यापूर्वी त्याला  आयपीएलमध्ये  अवघड पेपर द्यायचा आहे. 

कमिन्सला या ऐतिहासिक कामगिरीचं मोल आयपीएल लिलावात मिळालं. आयपीएल 2024 च्या सिझनसाठी झालेल्या ऑक्शनमध्ये कमिन्सला तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांना सनरायझर्स हैदराबादनं खरेदी केलं.

नवा कॅप्टन

सनरायझर्स हैदराबादनं या सिझनसाठी कमिन्सला कॅप्टन म्हणून नियुक्त केलं. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम मागील  सिझनमध्ये सनरायझर्सचा कॅप्टन होता.

सनरायझर्सच्या मॅनेजमेंटनं मार्करामची हकालपट्टी करत 'नवा सिझन, नवा कॅप्टन' ही परंपरा सलग चौथ्या वर्षी कायम ठेवलीय.

आयपीएल 2021 मध्ये डेव्हिड वॉर्नर सनरायझर्सचा कॅप्टन होता. त्याची अर्ध्या सिझनमधूनच हकालपट्टी करत केन विल्यमसनकडं कॅप्टनसी सोपवण्यात आली होती. आयपीएल 2022 मध्ये केन विल्यमसननं टीमची धुरा सांभाळली. तर मागील सिझनमध्ये मार्करम कॅप्टन होता. आता पॅट कमिन्सच्या खांद्यावर टीमचा भार सोपवण्यात आलाय. नव्या सिझनमध्ये कमिन्ससमोर 3 मोठी आव्हानं असून त्यामुळे त्याला हा पेपर अवघड असणार आहे.

टॉपला कसं नेणार?

सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2020 नंतर एकदाही 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करता आलेला नाही. 2021 आणि 22 मध्ये त्यांचा आठवा तर 2023 साली दहावा क्रमांक होता. आता या सिझनमध्ये टीमला टॉप 4 मध्ये नेण्याचं पहिलं आव्हान सनरायझर्सपुढं आहे.

स्वत:ला सिद्ध करणार?

सनरायझर्सनं पॅट कमिन्सच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून त्याच्यासाठी मोठी किंमत मोजलीय. त्याला आता आयपीएलमध्ये वैयक्तिक कामगिरीतूनही ही किंमत सार्थ ठरवावी लागेल.

कमिन्सनं आत्तापर्यंत 42 मॅचमध्ये 8.54 च्या सरासरीनं 45 विकेट्स घेतल्या आहेत. तर 3 हाफ सेंच्युरींसह 152.21 च्या स्ट्राईक रेटनं 379 रन्स केले आहेत. यामध्ये 14 बॉलमधील एका हाफ सेंच्युरीचाही समावेश आहे. सनरायझर्सला त्यांच्या कॅप्टनकडून बॉल आणि बॅट या दोन्ही माध्यमातून यापेक्षा जास्त अपेक्षा असेल,

टीमचा बॅलन्स कसा करणार?

सर्वोत्तम प्लेईंग 11 ची निवड करण्यात आलेलं अपयश हे देखील सनरायझर्स हैदराबादच्या अपयशाचं प्रमुख कारण आहे. सनरायझर्सकडं प्रत्येक जागेवर अनेक पर्याय आहेत. त्यामधून त्यांना योग्य खेळाडूंची निवड करण्यात मॅनेजमे्ंट अपयशी ठरलंय.

अब्दुल समाद आणि अभिषेक शर्मा या भारतीय खेळाडूंचा पूर्ण वापर अद्याप त्यांना करता आलेला नाही. त्याचबरोबर 2022 च्या सिझनमधील X फॅक्टर असलेल्या उमरान मलिकला मागील सिझनमध्ये बहुतेक वेळ बेंचवरच बसावे लागले होते. विदेशी खेळाडूंमध्येही यंदा सनरायझर्सकडं बरेच सर्वच चांगले पर्याय आहेत. यामधील कोणते सर्वोत्तम खेळाडू कमिन्स खेळवतो यावर त्यांची या सिझनमधील वाटचाल अवलंबून आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com