Ruturaj Gaikwad CSK Captain: आयपीएल 2024 मधील पहिला सामना सुरु होण्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सनं मोठा निर्णय घेतलाय. सीएसकेनं पुणेकर ऋतुराज गायकवाडची नवा कॅप्टन म्हणून घोषणा केली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या सामन्यानं आयपीएल 2024 ला सुरुवात होतीय. त्यापूर्वी सीएसकेनं ही घोषणा केलीय. महेंद्रसिंह धोनी हा सीएसकेचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीखाली सीएसकेनं पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
सीएसकेनं सोशल मीडिया हँडल X वर एक पोस्ट करत याबाबतची घोषणा केलीय. ऋतुराजनं टीम इंडियाकडून आत्तापर्यंत 6 वन-डे आणि 19 टी20 सामने खेळले आहेत. त्यानं 2020 मध्ये सीएसकेकडून पदार्पण केलं. त्यानं सीएसकेकडून 52 सामने खेळले असून आयपीएल 2021 आणि 2023 मध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या सीएसके टीमचा तो सदस्य आहे.
OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
ऋतुराजनं मागील आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. त्यानं 16 मॅचमध्ये 147.50 च्या स्ट्राईक रेटनं 590 रन काढले होते. महेंद्रसिंह धोनी या आयपीएल सिझननंतर निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सिझनमध्ये धोनीच्या उपस्थितीमध्ये ऋतुराजला कॅप्टन करण्याचा निर्णय सीएसके मॅनेजमेंटनं घेतलाय.
सीएसकेनं यापूर्वी रविंद्र जडेजाला टीमचा कॅप्टन केलं होतं. पण तो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. आयपीएल 2022 मधील अर्ध्या सिझननंतरच जडेजाला हटवून पुन्हा धोनीला कॅप्टन करण्यात आलं होतं. जडेजाकडं त्यापूर्वी कॅप्टनसीचा कोणताही अनुभव नव्हता. पण, ऋतुराजनं यापूर्वी निरनिराळ्या पातळीवर टीमचं नेतृत्त्व केलंय. तो महाराष्ट्र टीमचा कॅप्टन होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीमला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या टीमचाही तो कॅप्टन होता. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा तो व्हाईस कॅप्टन होता. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून सीएसकेचा भावी कॅप्टन म्हणून त्याचं नाव घेतलं जात होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world