सूरज कसबे, प्रतिनिधी
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association - MOA) बहुचर्चित अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सस्पेन्स आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत अपेक्षित असताना, निवडणूक होण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांमध्ये 'हाफ-हाफ' फॉर्म्युल्यावर तोडगा निघाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे..
निवडणुकीपूर्वीच सेटलमेंट?
महायुतीमधील भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेत असल्याने मित्रपक्षांमध्ये होणारी ही लढत टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फॉर्म्युला काय आहे?
दोन्ही गटांतील उच्च पदस्थांच्या बैठकीनंतर हा समझोता झाला. यानुसार, अध्यक्षपदाच्या एकूण कार्यकाळात दोघांनाही अर्धा-अर्धा कार्यकाळ मिळणार आहे. म्हणजेच, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ हे प्रत्येकी 2-2 वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषवतील. या समझोत्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची दिल्लीतील शिष्टाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप निर्णायक ठरल्याचे समजते.
( नक्की वाचा : Pune News: पुणे पुन्हा 'गँगवॉर'च्या विळख्यात! आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या )
मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेतल्यामुळे अजित पवारांचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (MOA) अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. अजित पवार हे यापूर्वी तीन वेळा MOA चे अध्यक्ष राहिले आहेत आणि आता ते चौथ्यांदा या पदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेकडून MOA च्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. 2006 ते 2018 या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते. 'कुलींग ऑफ पीरियड'नंतर 2025 मध्ये ते पुन्हा राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष झाले आहेत.
मोहोळ यांचे गंभीर आरोप
या निवडणुकीमध्ये उडी घेताना मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सचिवांवर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. सचिवांकडून होणाऱ्या गैरप्रकारावर अजित पवार यांनी लक्ष घातल्यास आपण निवडणूक लढणार नाही, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, भाजपचे नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांना निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली होती. क्रीडा संघटनांवर केवळ माजी खेळाडूच असावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
( नक्की वाचा : Sikandar Shaikh: महाराष्ट्र 'केसरी' चा बळी? सिकंदर शेखच्या अटकेनंतर वडिलांचा खळबळजनक आरोप )
रविवारी होणार घोषणा
मुरलीधर मोहोळ यांनी अधिकृतरित्या माघार घेतल्याचे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. रविवार, 2 नोव्हेंबर रोजी मोहोळ यांची माघार आणि महायुतीतील 'सेटलमेंट' अधिकृतरित्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जर हा समझोता झाला नाही, तर 60 मतदारांवर या दोन तगड्या नेत्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world