पुण्यातील प्रसिद्ध युवा उद्योजक आणि क्रीडा क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व पुनीत बालन यांची 'अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र'च्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेला अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी येथे अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या विशेष कार्यकारी सभेत पुनीत बालन यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
आळंदीतील बैठकीत सर्वानुमते मंजुरी
ही महत्त्वपूर्ण बैठक सपना वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला राज्याच्या विविध भागांतून आलेले संघटनेचे पदाधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुनीत बालन यांच्या निवडीचा मुख्य ठराव सातारा येथील ज्ञानेश काळे यांनी सभेत मांडला. या ठरावाला छत्रपती संभाजीनगर येथील गोकुळ तांदळे यांनी सहमती दर्शवत अनुमोदन दिले. यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरत या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
क्रीडा व्यवस्थापनातील दांडगा अनुभव
पुनीत बालन हे केवळ उद्योजक नसून महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विविध क्रीडा स्पर्धा, व्यावसायिक लीग आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात पुनीत बालन ग्रुपचे मोठे योगदान राहिले आहे. क्रीडा व्यवस्थापनातील त्यांचा हाच दांडगा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील कबड्डी खेळाला अधिक कॉर्पोरेट आणि व्यावसायिक स्वरूप मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
"तळागाळातील कबड्डीपटूंना योग्य व्यासपीठ मिळवून देणार"
पुनीत बालन यांनी म्हटलं की, “अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. कबड्डी हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आहे. या खेळाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अधिक मजबूत करणे हे आपले सामूहिक ध्येय आहे. आगामी काळात संघटनेत पूर्ण पारदर्शकता आणणे, व्यावसायिक नियोजन करणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देणे ही माझी प्राथमिकता असेल.”
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
चित्रपट निर्मिती क्षेत्रातही ठसा
पुनीत बालन यांनी केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतही आपल्या निर्मितीचा वेगळा ठसा उमटवला आहे. पुनीत बालन यांनी गाजलेल्या 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची दखल घेऊन बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने हिंदीमध्ये 'अंतिम' या नावाने त्याची पुनर्निर्मिती केली होती.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना घेऊन महेश लिमये दिग्दर्शित 'आशेची रोषणाई' या लघुपटाची निर्मिती देखील त्यांनी केली. काश्मीरमधील हिंदूंची सद्यस्थिती मांडणारा शरद मल्होत्रा अभिनित 'द हिंदू बॉय' आणि भारतीय लष्करासोबत 'गुड शॉट' या लघुपटांची निर्मितीही त्यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world