जाहिरात

Rohit Sharma Interview: निवृत्त होणार नाही! रोहितने ठोक-ठोक ठोकले, पण अनेकांना नाही पटले

वैयक्तिक असमाधानकारक कामगिरी,सिडनी टेस्टमध्ये न खेळणे आणि निवृत्तीच्या चर्चा ह्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माची ही मुलाखत अत्यंत महत्वाची होती.

Rohit Sharma Interview: निवृत्त होणार नाही! रोहितने ठोक-ठोक ठोकले, पण अनेकांना नाही पटले
मुंबई:

रवी पत्की

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (Border-Gavaskar Trophy) लंच टाइममध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची मुलाखत (Rohit Sharma Inyterview) घेण्यात आली.  इरफान पठाण आणि जतीन सप्रू या दोघांनी रोहित शर्माची ही मुलाखत घेतली होती.  वैयक्तिक असमाधानकारक कामगिरी,सिडनी टेस्टमध्ये न खेळणे आणि निवृत्तीच्या चर्चा ह्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत अत्यंत महत्वाची होती. भारत आणि अमेरिका किंवा भारत आणि रशिया ह्यातील द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर संयुक्त निवेदन काय निघते,त्यातून काय संदेश मिळतो,कोणते शब्द वापरले जातात,त्यावरून अर्थ काय काढायचे अशी जागतिक पातळीवर जी उत्सुकता असते तितकीच क्रिकेट जगात आज रोहित काय बोलला ह्याचे अतिशय बारकाईने विश्लेषण केले जाईल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोहित बोरीवलीच्या एखाद्या'भाई'सारखा बोलतो. त्याच्या बोलण्याला मुन्नाभाईमधला 'सर्किट'चा टच असतो. त्यामुळे त्याची मुलाखत म्हणजे पत्रकारांचे तुफान मनोरंजन असते. आज देखील सिडनीच्या ग्राउंडमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्याने पत्रकारांना अजिबात निराश केले नाही.  "अपने लडके,में बोलता ना यार,कोई उंगली करेगा तो अपने लडके भी...., बोलबच्चन नही देनेका, मेरेको, तेरेको, ये बंदा वो बंदा" असे बंबईय्या शब्द वापरत रोहितने मुलाखत दिली. 

इतक्या लांबून मी काय फक्त बसायला आलोय का ? मला सामने खेळायचेत आणि मला सामने जिंकूनही द्यायचेत. 2007 साली जेव्हा मी पहिल्यांदा ड्रेसिंगरुममध्ये आलो होतो तेव्हाही माझ्या मनात हेच होतं की मॅज जिंकायचीय. टीमची गरज काय आहे हे तुम्हाला समजणे गरजेचे असते- रोहित शर्मा

नक्की वाचा :सिराज-कृष्णाचा जलवा, कांगारुंची दाणादाण; ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर गुंडाळलं

आता त्याची मुलाखत डिकोड करूया. मुलाखतीतून त्याला मुख्य संदेश द्यायचा होता की मी काही निवृत्त होत नाहीये.तो खुंटा त्याने पाच वेगवेगळ्या प्रकारे बळकट केला. मी पुढचा विचार करत नाही,निवृत्त होण्याचा बिलकुल विचार नाही,दोन मुलांचा मी बाप आहे;मला योग्य अयोग्य कळतं, माईकवाले,पेनवाले माझे भविष्य ठरवू शकत नाहीत आणि अगदी शेवटी "में किधर नही जारा" असे म्हणत त्याने मुलाखतीचा निरोप घेणे, हे सगळे आपण निवृत्त होणार नाही हे ठासून सांगण्यासाठीच होते.  कॉलेजमधे जाणाऱ्या मुलाला, शनिवारी रात्री मित्राकडे राहायला जायचे असते तेव्हा तो वडिलांशी परवानगी मिळवण्याकरता आठवडाभर वडिलांना सांगून आठवण करून देत असतो, तसंच काहीसं रोहित आज करत होता.  

संघाबाहेर बसण्याचा निर्णय म्हणजे निवृत्तीचा निर्णय नाहीये. आणि मी गेममधून हटणारही नाहीये- रोहित शर्मा

नक्की वाचा : 'आमचा कॅप्टन', बुमराहनं केलं रोहितचं असं वर्णन की जिंकलं संपूर्ण देशाचं मन

मुळात रोहित टेस्ट टीमचा कॅप्टन झाला ते एकदिवसीय आणि T20 च्या आणि IPL च्या पुण्याईवर. त्याचे टेस्टमधील स्थान देखील मर्यादित षटकांच्या सामन्याच्या पराक्रमावर आधारित आहे, असे म्हणायला वाव आहे. थोडे आकडे बघू. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड जे बॅटींगसाठी आव्हानात्मक देश आहेत तिथे रोहितची 49 इनिंगमध्ये सरासरी 28 आहे. त्यात फक्त 5 अर्धशतके आणि 1 शतक आहे. रोहित 49 इनिंगमध्ये 30 वेळा 30 च्या आत बाद झाला आहे. गेल्या वर्षी रोहितने भारतात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये 19 डावात फलंदाजी केली होती.यात त्याची सरासरी होती 27. यामुळे रोहितवर 'फ्लॅट ट्रॅक बुली' चा शिक्का मारला जातो, ही आकडेवारी पाहिल्यास त्या तथ्य वाटू लागते. 

कोणीतरी एक माणूस लॅपटॉप घेऊन बसलाय, माईक घेऊन बसलाय आणि पेन घेऊन बसलाय. ते काय लिहितात आणि बोलतात यामुळे आमचे जीवन बदलत नाही. ही लोकं ठरवू शकत नाही की आम्ही कधी जावं, आम्ही कधी खेळू नये किंवा आम्ही कधी बाहेर बसावे आणि आम्ही कधी संघ नेतृत्व करावे. मी सेन्सिबल, विचारी माणूस आहे. दोन मुलांचा बाप आहे. मला थोडंसं डोकं आहे आणि आयुष्यात मला काय करायचंय हे मला माहिती आहे- रोहित शर्मा

2019 पासून पुढची 5 वर्षे  रोहितने 71 एकदिवसीय सामन्यात 9 शतके आणि 19 अर्धशतके ठोकली आहेत. T20 आणि IPL मध्ये 140 आणि 130 च्या स्ट्राईक रेटने बॉलर्सना तुडवला आहे. कसोटीत भारतीय पिचेसवर अधूनमधून धावा आणि एकदिवसीय आणि T20 मध्ये पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात धावांचा रतीब असा त्याचा करिअर आलेख आहे. स्विंग,सीम आणि स्पिन ह्या तिन्ही आव्हानांना कसोटीत टक्कर देण्याचा संयम आणि तंत्र त्याच्याकडे कमी आहे हे मान्य करावे लागेल. डोळ्याचे पारणे फेडायला लावणारी बॅटिंग करण्यात रोहितचा हात कोणी धरू शकत नाही, हे खरे असले तरी त्याचे कसोटीतील गेल्या काही वर्षाचे स्थान मर्यादित षटकांच्या कामगिरीवर आधारित आहे. त्यात हे मोठे स्टार लोक रणजी हंगामात उपलब्ध नसतात आणि असले तर परदेशात सुट्टीवर गेलेले असतात.

निस्वार्थी कप्तान

रोहितने एकदिवसीय आणि T20 मध्ये काही उत्तम निर्णय घेतले. विशेषतः सलामीला जाऊन विकेटची पर्वा न करता स्कोरिंग रेट वाढवणे.  रोहितची तारीफ करणारे म्हणतात की, तो निकालाची काळजी न करता संघसहकाऱ्यांना मुक्तरित्या खेळण्यासाठी प्रोत्साहन देतो, संघभावना विकसित करतो वगैरे वैगरे. त्यात अनेक समालोचकांनी त्याचे वेळोवेळी समर्थन करून निस्वार्थी कप्तानी ही बॅटिंगमधल्या अपयशावर वरचढ असते असा नॅरेटीव्ही सेट केला आणि लोकांना मान्य करायला लावला. जतीन सप्रू आणि इरफान पठाणने आज मुलाखत घेताना तेच केले.

रोहितने अनेकदा त्याच्या बॅटिंगने आपल्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे.त्याच्या कप्तानीत  भारतानेT20 वर्ल्ड कप जिंकला .त्याबद्दल क्रिकेट रसिक कायम त्याच्यावर प्रेम करणार आहेत,कृतज्ञ राहणार आहेत.पण आता हालचाली मंदावल्या आहेत. करिअरचा सूर्य क्षितिजावर आलेला दिसत आहे.आकडे देखील तसे बोलतायत.त्यामुळे मैदानावर बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या रोहित शर्माने आपल्या खास शैलीत शब्दांनी ठोक-ठोक ठोकले, पण अनेकांना नाही पटले. 


(लेखक हे क्रिकेटप्रेमी आहेत, लेखामध्ये लेखकाने व्यक्त केलेली मते ही त्याची वैयक्तिक मते आहेत.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com