जाहिरात
Story ProgressBack

लोकसभा निवडणुकीत घातपाताचा कट उधळला, गडचिरोली पोलिसांना मोठं यश

Read Time: 2 min
लोकसभा निवडणुकीत घातपाताचा कट उधळला, गडचिरोली पोलिसांना मोठं यश
गडचिरोली पोलिसांनी नक्षली तळावर मोठी कारवाई केली आहे.
गडचिरोली:

लोकसभा निवडणुकीचा प्रचार (Loksabha Election 2024) आता सर्वत्र सुरु झाला आहे. देशात यंदा सात टप्प्यात मतदान होतंय. हे मतदान शांततेत व्हावं, निवडणूक प्रचाराच्या दरम्यान कोणताही हिंसाचार होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. सुरक्षा यंत्रणांना गडचिरोली जिल्ह्यात मोठं यश मिळालंय. निवडणुकांच्या दरम्यान घातपात करण्याच्या नक्षलवाद्यांचा कट गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) उधळून लावलाय. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या कारवाईत स्फोटकं तसंच इतर वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त केल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

 महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ काही नक्षलवादी तळ ठोकुन असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली

या मोहिमेच्या दरम्यान बुधवारी (27 मार्च) रात्री पोलीस आणि नक्षलवावाद्यांमध्ये मोठी चकमक झाली.  पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलवावाद्यांनी अंधाराच्या फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. गुरुवारी पहाटे या घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात घातक स्फोटके आणि इतर साहित्य आढळून आले आहे. 

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर चिप्पूरभट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलानं कंठस्नान घातलं होतं.  त्यानंतर पुन्हा एकदा गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात राबवलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत गडचिरोली पोलिसांना हे यश मिळालंय. कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडमधल्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा  घातपात करण्याचा उद्देशाने भुमकन गावाजवळ तळ ठोकुन असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.  

पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक

अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वातील विशेष अभियान पथकाचे 8 पथक आणि सीआरपीएफच्या 1 क्युएटीसह या जंगल परिसरात शोध मोहीम हाती घेतली. ही मोहिम सुरु असताना माओवाद्यांनी अचानक सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्या गोळीबारास अभियान पथकानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. 27 मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान सुरू झालेली ही चकमक रात्री साडे अकरापर्यंत तर पुन्हा पहाटे साडेचारपर्यंत सुरू होती. या चकमकी दरम्यान चकमकीमध्ये माओवाद्यांनी अभियान पथकावर बीजीएलचाही मारा केला. परंतु अभियान पथकाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अभियान पथकाचा वढता दबाव पाहुन अंधाराचा फायदा घेऊन माओवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination