- पुणे पोलिसांनी ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तरुणांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला
- पोलिसांनी दंड ठोकल्यानंतर तरुणाचे लायसन्स जप्त करून स्वतःच्या गाडीने निघून गेले
- तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
Pune News: पुणे पोलीस त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत नागरिकांमध्ये भीती निर्माण करत असल्याचा आरोप पुन्हा करण्यात येतोय. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पुणे पोलिसांनी माणसासारखी वागणूक दिली नसल्याचा दावा एका तरुणाने केलाय. व्हिडीओमध्ये तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, तरुण मित्रांसह त्याच्या गाडीवरुन ट्रिपल सीट प्रवास करत होता. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. तोपर्यंत सर्व काही ठीक होते. पण नंतर पोलिसांनी त्याचे लायसन्स जप्त केले आणि पोलीस स्वतःच्या गाडीने निघून गेले. याच गोष्टीवर संबंधित तरुणाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांनी तळतळाट दिलाय.
तरुणाने व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलंय?
"मजबूर माणसाची अवस्था कशी असते ते तुम्हाला सांगतो, मी पुण्यामध्ये आहे आणि पोलिसांनी माझी गाडी जप्त केलीय. आम्ही ट्रिपल सीट प्रवास करत होतो म्हणून एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला, जे बरोबर आहे. पण यानंतर साहेबांनी (पोलीस) माझ्याकडून लायसन्स घेतले, खिशात घातलं आणि साहेब निघाले. कोणत्या कारणांसाठी लायसन्स जप्त केलं जातं, ही माहिती शोधण्यासाठी मी गुगलवर सर्च केलं तर अगदी गंभीरातील गंभीर प्रकरणांमध्ये लायसन्स जप्तीची कारवाई केली जाते. मी साहेबांच्या मागे अडीच किलोमीटर पळतोय, ते चाललेत पुढे-पुढे... त्यांनी मला माणसासारखी वागणूक दिलीच नाही. मी भीक मागतोय, मला माहितीय मी चुकलो. पण तळतळाटही लागतो बरं का... मान्य आहे तुम्ही तुमची ड्युटी करताय पण समोरचाही माणूस आहे, हे विसरून जेव्हा ड्युटी करता ना तेव्हा खूप तळतळाट लागतो", अशा भावना तरुणाने व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
(नक्की वाचा: Pune News: त्या अफवेने पुण्याच्या लष्कर भागात स्थानिकांमध्ये प्रचंड भीती, खळबळ उडाल्याने पोलिसांचं मोठं आवाहन)
(नक्की वाचा: Pune Viral Video: सिगारेटचे पैसे मागितले, फुकट्या ग्राहकाने कोयता काढला अन्... पुणेकरांमध्ये मोठी दहशत)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय आणि नेटकरी या तरुणाला पाठिंबा दर्शवत आहेत.