पाकिस्तानमध्ये पावसाने धुमाकुळ घातला आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे 87 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 82 जण जखमी आहेत. पाकिस्तानच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरूच आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी सांगितले की, पावसामुळे देशभरात 2,715 घरांचे नुकसान झाले आहे. बहुतेक लोकांचा मृत्यू इमारतीचे काही भाग पडल्यामुळे झाला आहे तर काहींचा वीजेचे खांब पडल्याने झाला आहे आणि काहींचा पुरामुळे मृत्यू झाला आहे.
उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वामध्ये सर्वाधिक नुकसान!
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे 36 जणांना जीव गमवावा लागला तर 53 जण जखमी आहेत. यानंतर पूर्व पंजाब प्रांतामध्ये 25 जणांचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाल्याची माहिती एनडीएमएने दिली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पावसामुळे 11 जणांचा मृत्यू !
दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतामध्ये एकूण 15 लोकांचा मृत्यू आणि 10 जण जखमी आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे 11 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी असल्याची माहिती एनडीएमएने दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पावसामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित विभागांना बाधित भागात मदतकार्याला गती द्यावी आणि पाऊस आणि भूस्खलनामुळे बंद पडलेले रस्ते खुले करण्याचे काम जलदगतिने करावे, असे आदेश दिले आहेत.
पावसामुळे पुराचा इशारा
याआधी शुक्रवारी एनडीएमएने त्यांच्या हवामान अंदाज अहवालात 22 एप्रिलपर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. पावसामुळे देशातील अनेक भागात पुराचा इशाराही देण्यात आला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world