
रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाईन, इस्रायल-इराण यांच्यातील युद्धानंतर आणखी एका युद्धाला सुरुवात झाली आहे. कंबोडिया आणि थायलँड या दोन देशांमध्ये युद्ध पेटले असून यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. थाई सैन्याने कंबोडियाचील लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केल्याचीही माहिती मिळते आहे. थायलँडच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की दोन देशांच्या सीमेवर किमान 6 ठिकाणी चकमकी सुरू आहेक. या चकमकींची सुरूवात गुरुवारी सकाळी थायलँडचा सुरीन प्रांत आणि कंबोडियाच्या ओद्दार मीनची प्रांताच्या सीमेवर असलेल्या मुएन थॉम मंदिर परिसरात झाली.
युद्ध लादल्याचा एकमेकांवर आरोप
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या माली सोचीता यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "थायी सैन्याने कंबोडियाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांवर हल्ला चढवला. याला कंबोडियाच्या सैन्याने चोख उत्तर दिले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आत्मरक्षणाचा अधिकार वापरत कंबोडियाने प्रतिहल्ला केल्याचे माली यांनी सांगितले. कंबोडिया आणि थायलँड एकमेकांवर युद्धाला प्रवृत्त केल्याचा आरोप करत आहेत. या सगळ्या परिस्थितीला कंबोडियाच जबाबदार असल्याचे थायलँडने म्हटले आहे. कंबोडियाने आपल्या निष्पाप नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप थायलँडने केला आहे. 'सुरीन' भागातील 'कप चोएंग'वर क्षेपणास्त्र डागण्यात आली ज्यात तीन जण जखमी झाल्याचे थायलँडचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा: घटत्या लोकसंख्येवर अजब उपाय! 'या' देशात विद्यार्थिनींना गर्भवती झाल्यावर मिळणार 1 लाख रुपये )
कंबोडिया सोडण्याचे थायी नागरिकांना आवाहन
दरम्यान, थायलँडच्या दूतावासाने गुरुवारी आपल्या नागरिकांना कंबोडिया सोडण्याचे आवाहन केले आहे. दूतावासाने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, थायलँडच्या लोकांनी "अत्यावश्यक कारण नसल्यास थायलँडच्या लोकांनी ताबडतोब कंबोडिया देश सोडावा." गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीच्या काही तासांपूर्वीच कंबोडियाने थायलँडसोबतचे आपले राजनैतिक संबंध जवळपास संपुष्टात आणले. कंबोडियाने थायलँडमधील एक राजदूत वगळता इतर सगळ्या राजदूतांना माघारी बोलावले आहे. दोन्ही देश जशास तसे उत्तर देण्याच्या मानसिकतेत आले असून थायलँडने सीमा ओलांडण्यास मज्जाव केला आहे.
( नक्की वाचा: परदेशी महिला झटपट मराठी शिकली, नवऱ्याला विचारतेय; रात्री जेवायला काय आहे? )
नेमका वाद काय आहे ?
कंबोडिया आणि थायलँड हे शेजारी देश असून या दोन्ही देशांची 817 किलोमीटरची सीमा सामाईक आहे. ही सीमा फ्रान्सने बनविली होती आणि यावरून वाद आहेत. फ्रान्सने 1863 ते 1953 दरम्यान कंबोडियावर राज्य केले होते. 1907 साली फ्रान्सने दोन्ही देशांची सीमा निश्चित करतानाच एक नकाशा बनवला होता. थायलँडने या नकाशाला विरोध केला होता कारण या नकाशानुसार 11 व्या शतकातील प्रीह विहियर मंदिर कंबोडियात दाखवले होते. युनेस्कोने हे मंदिर कंबोडियात असल्याचे म्हटले होते. हे मंदिर भगवान शंकराचे मंदिर असून ते अत्यंत प्राचीन आहे. कालांतराने या मंदिराचा वाद आंतरराष्ट्रीय कोर्टात गेला होता. 1962 साली आंतरराष्ट्रीय कोर्टाने हे मंदिर कंबोडियात असल्याचे जाहीर केले होते. हा निर्णय थायलँडने मान्य केला खरा मात्र मंदिराच्या आसपासच्या भूभागावरून वाद कायम राहिला.