जाहिरात

Ajit Pawar : नातं तुटायला वेळ लागत नाही, बारामतीत भाषण करताना अजित पवार भावुक

Ajit Pawar Emotional Speech VIDEO: अजित पवारांनी भाषण करताना म्हटलं की,  लोकसभेला मी चूक केली, मग आता चूक कुणी केली. आई सांगत होती माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभं करू नका. 

Ajit Pawar : नातं तुटायला वेळ लागत नाही, बारामतीत भाषण करताना अजित पवार भावुक

देवा राखुंडे, बारामती

बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार असा सामाना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एका पवार कुटुंब आमने-सामने येणार आहे. अजित पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांना बारामतीकरांना संबोधित केलं. यावेळी नेहमी सडेतोड बोलणारे अजित पवार काहीसे भावुक झालेले पाहायला मिळाले. 

अजित पवार भाषण करत असताना त्यांना भरुन आल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या कार्यकर्त्याकडून पाणी घेतलं आणि प्यायले. अजित पवारांनी भाषण करताना म्हटलं की,  लोकसभेला मी चूक केली, मग आता चूक कुणी केली. आई सांगत होती माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभं करू नका. 

नातं तुटायला वेळ लागत नाही, असं बोलताना अजित पवार काही वेळ थांबले आणि पाणी प्यायले. यावेळी त्याच्या आवाजातही थोडा बदल झालेला जाणवला. प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारातमीतील निवडणुकीमुळे अजित पवार भावुक झाल्याचं दिसून आलं. कार्यकर्तेही यावेळी अजित पवारांना धीर देताना दिसले. 

लोकसभेला मी चुकलो सुप्रियाच्या विरोधात सूनेत्राला उभं करायला  नको होतं. बारामतीने ठरवलं होतं लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. दादा म्हणजे मी. आता कुणीही गावं सोडून इतरत्र प्रचाराला जावू नका. हे मी का सांगतोय, कारण माझच घर एकत्र नाही त्यामुळे सांगतोय, असंही अजित पवार म्हणाले. 

इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. खरा एकोपा राहायाला पिढ्यांपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही. त्यांना विचारले फॉर्म का भरताय. तर म्हणतात साहेबांनी सांगितले. मग साहेबांनी आमच्या तात्या साहेबांचं घर फोडलं का? घरातील भांडण चार भिंतीच्या आत झालं पाहिजे चव्हाट्यावर आणायचं कारण नाही, असंही अजित पवार म्हणाले.

लढाई कौटुंबिक नाही, राजकीय : श्रीनिवास पवार

निवडणुकीत अजित पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर आले आहेत, यावर बोलताना श्रीनिवास पवार यांनी म्हटलं की,  या गोष्टीची आता हळूहळू सवय होत आहे. सुरुवातीला हा धक्का असतो. दोन पक्ष झाले आहेत, त्यामुळे या गोष्टी होतात हे कौटुंबिक नाही हे राजकीय आहे. दोन्ही पक्ष आपापली लढाई मनापासून लढत आहेत.

अजित पवार भावुक झाले यावर त्यांनी म्हटलं की, मी बघितले नाही ते भावूक झाले. एखाद्या वेळेस घसा कोरडा पडला म्हणून पाणी पण प्यायले असतील. मला कोणीतरी सांगितले की ते पाणी प्यायले. बघितल्यावर कळेल ते भावुक झालते की त्यांना तहान लागली म्हणून ते पाणी प्यायले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com