
यावर्षी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा
मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ 1878 मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे 1878 मध्ये सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले संमेलन 1878 मध्ये पुणे येथे पार पडले.
- यानंतर 1909 मध्ये म्हणजेच तब्बल 21 वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
- 1917 मध्ये म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.
- 1921 मध्ये तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.
- 1928 मध्ये तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.
- 1929 मध्ये पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
- 1930 मध्ये सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
- 1931 मध्ये सतरावे संमेलन तेलंगणातील हैदराबाद येथे पार पडले.
- 1934 मध्ये तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
- 1935 मध्ये एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.
- 1946 मध्ये तब्बल अकरा वर्षांनी 30 वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
- 1947 मध्ये 31 वे संमेलन तेलंगणातील हैदराबाद येथे पार पडले.
- 1951 मध्ये तब्बल चार वर्षांनी 34 वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.
- 1953 मध्ये 36 वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.
- 1954 मध्ये 37 वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.
- 1961 मध्ये 43 वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.
- 1964 मध्ये 45 वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
- 1967 मध्ये 47 वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.
- 1981 मध्ये तब्बल 14 वर्षांनी 56 वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.
- 2000 मध्ये 73 वे संमेलन तब्बल 19 वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.
- 2001 मध्ये 74 वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.
- 2015 मध्ये तब्बल 14 वर्षांनी 88 वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले.
- 2018 मध्ये 91 वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.
यानंतर यंदा तब्बल 7 वर्षांनी पुन्हा 2025 मध्ये 98 वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा जागर
मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्द, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, लोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे. या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.
या भव्य सोहळ्याचा भाग बना!
दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन सरकार तर्फे करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world