देवा राखुंडे, बारामती
विधानसभा निवडणूक जसजशी तोंडावर येत आहे, तसतशी बारामतीत निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा सिलसिला सुरू आहे. या अगोदर ही बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता त्यांना उद्देशून एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं. आता पुन्हा एकदा शरद पवारांना उद्देशून एक निनावी पत्र "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" या मथळ्याखाली 'गब्बर' नावाने हे पत्र व्हायरल झाल आहे. या पत्रातून शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सुप्रिया सुळे विजयानंतर कार्यकर्त्यांचे फोन उचलत नसल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. तर युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारीची चर्चा सुरु आहे. यावरुनही या पत्रातून शरद पवार यांच्यावर निशाण साधण्यात आली आहे.
(नक्की वाचा- मनोज जरांगेंचं सहाव्यांदा उपोषण; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी, सत्ताधाऱ्यांनाही इशारा)
पत्रात काय म्हटलंय?
नमस्कार बारामतीकर ! मी आज पुन्हा आपणासमोर बारामतीध्ये चर्चेला असणाऱ्या सुप्त गोष्टी मांडत आहोत. ज्या मोठ्यानं आणि धाडसानं बोलणं म्हणजे साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे. आणि न बोलणं म्हणजे तोंड दाबुन लाथा बुक्क्यांचा मार, जो आपण भोळ्या भाबडया बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेला दिला. त्याचे दुष्परिणाम असे की आमच्या ताई निवडणुकीपूर्वी खुप शुद्ध बोलून बेशुद्ध करायच्या (आश्वासन द्यायच्या) मात्र आता कार्यकर्त्यांचे येणारे फोनच उचलत नाहीत. तुम्ही तर आता नवख्या लेकराला खुर्ची देऊन राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासार्हतेचा पोरखेळ करून संगीतखुर्ची मांडताय.
बारामतीने आपणास चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याकरिता भरभरून प्रेम दिले. तुम्ही तुमचा वारसा दादांना दिला, तुमचं मार्गदर्शन आणि दादांचं परिश्रम यातुन बारामतीचा विकास झाला. मग दादांनीही आपलं कौशल्य दाखवत इतर तालुक्याच्या तुलनेत दहा पटीने बारामतीचा विकास केला. मग एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला मग अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केला. आता तो नातूही तिकडं सेट झालाय. मात्र ही विषाची परीक्षा कशासाठी की आता आणखीण एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघालाय! त्यामुळेच तर दलित आणि मुस्लिमांमध्ये खोट भितीचं आणि धार्मिक तेढाचं वातावरण पसरवून संभ्रम निर्माण करत आहात आणि तुमच्याच पुतण्याला (दादांना) जो तुमच्याच विचाराचा वारसदार आहे त्याला खलनायक बनवण्याकरिता फतवे काढायला लावत आहात.
(नक्की वाचा -लोकसभा निवडणुकीतनंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'; विधानसभेसाठी इच्छूकांची रांग)
संविधान बदलण्याच्या दाट शक्यता आहेत, असा प्रचार करत आहात. साहेब, लोकसभा निवडणुकीत आपण किती आश्वासने दिली की आम्ही निवडून आल्यायवर कामे, टेंडर दलित मुस्लीम बहुजनांना देऊ. मात्र आता मिशीवाले, खरड्या दाढीवाले लाभार्थीच मलिदा खातायत व लोकसभेला पळणारे कार्यकर्ते वाऱ्यावर फिरतायत. तात्पर्य काय की खरी मलिदा गँग तुपाशी व कार्यकर्ते उपाशी.
ज्यावेळी मराठा आरक्षणाचे आंदोलन जोर धरत महाराष्ट्र भर पेटले होते त्यावेळी तुमच्या घरातील एका नातवाने तुमच्यासमोर उर काढला व त्याने एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आरक्षणाचे समर्थन करत, एक ट्वीट केले. त्यावेळी तुम्ही त्याच्यावर रागाने डोळे वटारले. नंतर तर तुम्ही म्हणाला की लहान मुलांच्या गोष्टी मी मनावर घेत नाही. मात्र आता तुम्ही एका दुसऱ्या नातवाला त्याच्या पेक्षा लहानग्याला (दादांचा पुतण्या) पुढं करून बारामतीचा आमदार करून आमच्यावर जबरदस्तीने लादण्याच्या प्रयत्नात आहात.
दुसऱ्या नातवाने (दादांचा मुलगा) तर पाच वर्षापूर्वी खासदारकीची निवडणुक लढवली मात्र या नातवाला तर जनतेचे कसलेच प्रश्न कळत नाहीत काही जरी विचारलं तरी एकच उत्तर! उदया बारामतीच्या जनतेने त्याचेकडून कसल्या विकासाची अपेक्षा करायची? साहेब तुम्हीच सांगा, ही सगळी तुमच्याच खताची माणसं, दादांच्या कामाची, अनुभवाची तुलना (दादांचा पुतण्या) नवख्या पोराशी होऊ शकते का हो? तुमच्या घरगुती कलहापायी आम्हा बारामतीकरांवर हे ओझ लादू नका. ही लढाई फक्त तुमच्या घरातील श्रेयवादाची नाही तर ही लढाई बारामतीकरांच्या भवितव्याची आहे. व्यावहारिक विचार करा आणि आम्हास गृहीत धरण अस बंद करा, तुम्हीपण. आणि हो मागच्या पत्रात दादांवर बोललो आज तुमच्यावर कारण जे खरं आहे ते मी बोलणारच.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world