Pune Election 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच, भारतीय जनता पक्षाने बंडखोरांना रोखण्यासाठी आपला 'प्लॅन बी' अमलात आणला आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप यावेळी आपली अधिकृत उमेदवार यादी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणार नाही. त्याऐवजी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडक उमेदवारांना वैयक्तिकरित्या फोन आणि मेसेज करून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
थेट संपर्क आणि 'कामाला लागा'च्या सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सुमारे 25 ते 30 संभाव्य उमेदवारांना आतापर्यंत भाजपच्या वरिष्ठ फळीतून फोन किंवा मेसेज आले आहेत. "तुमची उमेदवारी निश्चित आहे, आतापासूनच प्रभाग पिंजून काढा आणि प्रचाराची तयारी सुरू करा," अशा स्वरूपाच्या सूचना या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पुण्यात इच्छुकांची धडधड वाढली असून, कोणाकोणाला फोन आले आहेत, याचीच चर्चा सध्या प्रभागांमध्ये रंगली आहे.
(नक्की वाचा- Pune Election 2026: घड्याळ- तुतारीवरुन वादंग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली; सूत्रांची माहिती)
निर्णय घेण्यामागची प्रमुख कारणे
बंडखोरी रोखणे- एकदा का अधिकृत यादी जाहीर झाली की, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते नाराज होऊन अपक्ष किंवा इतर पक्षातून अर्ज भरण्याची शक्यता असते. यादी जाहीर न केल्याने शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांमध्ये आशा टिकून राहते.
विरोधकांना चकवा देणे - महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांची चाचपणी सुरू असताना, भाजपने आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवल्याने विरोधकांसमोर पेच निर्माण होऊ शकतो.
प्रचाराला पुरेसा वेळ - ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, त्यांना गुपचूप सांगून प्रचारात आघाडी मिळवून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world