राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकांमुळे महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचे नाव बदलून 'माझी लाडकी बहीण' असं नामकरण अजित पवार गटाकडून केलं जात असल्याने शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अजित पवार यांच्य जनसन्मान यात्रेवरुनही महायुतीत मीठाचा खडा पडला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभा क्षेत्रात पोहोचली आहे. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या. त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचके यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या नाराजीचं कारण काय?
जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आले? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? या जुन्नर विधानसभेत नेमकं काय शिजतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशा बुचके यांनी पालकमंत्री अजित पवारांना धारेवर धरलं.
देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे, अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे सहन करणार नाही. असं म्हणत भाजपकडून विधानसभा लढायला इच्छुक असणाऱ्या आशा बुचकेंनी शड्डू ठोकलेत.
(नक्की वाचा- '...तर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 3 हजार रुपये देऊ')
अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. मिटकरी यांनी म्हटलं की, "जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा."
(नक्की वाचा- 'पु्न्हा सरकार आलं तर महिलांना 90 हजार रुपये देऊ'; अजित पवारांचं महिलांना मोठं आश्वासन)
शिंदे गटाचा बहिष्कार
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज होणाऱ्या आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे गटाने बहिष्कार टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या जन सन्मान यात्रेत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचे नाव बदलून 'माझी लाडकी बहीण' असं नामकरण करून प्रचार व प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात येत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात महायुती असतानाही आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल दिली जात असल्याने शिवसैनिकांनी नाराज होते आजच्या कार्यक्रमांवर आणि बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.