‘मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित होते. राजकीय जीवनातील आज सर्वात आनंदाचा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज बहीणमय झाला आहे. पुढील पाच वर्षात महिलांना 90 हजार रुपये देऊ, असं आश्वासन देखील अजित पवार यांनी राज्यातील महिलांना दिलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांनी म्हटलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आधी विरोधकांकडून विरोध केला गेला. काहीजण कोर्टात गेले, कोर्टात पण टिकलं नाही. लाडकी बहीण योजनेला आता महिला चांगला प्रतिसाद द्यायला लागल्या आहेत. महिलांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागलं आहे. मग आता काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे ही योजना तात्पुरती आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
मात्र मी सांगतो, आता या सरकारचे 5 महिने उरले आहेत. त्याचे 7500 हजार रुपये मिळतीलच. आपल्याला या योजनेचं सातत्य पुढेही टिकवायचं आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत तुम्ही महायुतीला पाठबळ द्या, पुन्हा संधी द्या. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला 90 हजार रुपये देण्याचं काम आम्ही करू, असं आश्वासन अजित पवार यांनी राज्यातील महिलांना दिलं.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
पैसे परत घेण्यासाठी दिलेले नाहीत
लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी खोटंनाटं सांगितलं. खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे महायुतीचे काही सहकारी उत्साहाच्या भरात बोलतात की तुम्हाला आम्ही हे दिलंय पण तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे काढून घेऊ. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी तिघांच्या साक्षीने सांगतो. हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिले आहेत. हे पैसे परत घेण्यासाठी दिलेले नाहीत. हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही काही बोललं तर त्यावर विश्वास ठेवू नका, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र बहीणमय झालाय
मागील 34 वर्ष राजकारणात आहे. अनेक महत्त्वाची पदे भूषवली. अनेक सरकारमध्ये काम केलं. मात्र आज जे चित्र आहे, ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडत आहे. महाराष्ट्र बहिणमय झाला आहे. काही वेगळा विचार केला नव्हता, मात्र राज्यातील महिला सक्षम झाली पाहिजे असा विचार होता, असं अजित पवार यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- 'वन नेशन, वन इलेक्शन'वर बोलायचं; दुसरीकडे 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येत नाहीत; शरद पवारांचा टोला)
विरोधकांकडून विनाकारण टीका
विरोधक कारण नसताना टीका करत आहेत. आधी बोलले महिलांसाठी योजना आणली मात्र भावांकडे लक्षच नाही. मात्र भावांकरती कृषीपंप वीज माफी केली. कुणीही तुमची वीज कापायला येणार नाही. अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान सरकार देतंय. तरुणांना प्रशिक्षणार्थी वेतन दिलं. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. त्यातून चांगल्या योजना सरकारकडून आणल्या जात आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world