जाहिरात

BMC Election: मुंबई महापालिकेत महायुतीचा पेच! एका मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेमधील चर्चा थंडावली?

Mumbai News: भाजपने मुंबईतील मराठी बहुल भागात स्वतःच्या जागा लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. जिथे मराठी मतदारांची संख्या मोठी आहे, तिथे भाजप आपले उमेदवार उतरवण्यासाठी आग्रही आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

BMC Election: मुंबई महापालिकेत महायुतीचा पेच! एका मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेमधील चर्चा थंडावली?

Mumbai Mahapalika Election: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांनी कंबर कसली असली, तरी जागा वाटपाचा गुंता सुटण्याऐवजी अधिकच जटील होताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागा वाटपाची चर्चा सध्या थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 150 जागांचा तिढा सुटल्याचा दावा नेत्यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक महत्त्वाच्या वॉर्ड्सवर दोन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

जागा वाटपातील खरी अडचण काय?

सुरुवातीला शिवसेनेने मुंबईतील 125 विशिष्ट जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने शिवसेनेला केवळ 53 जागा देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या बैठकीत 150 जागांवर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले. पण आता उरलेल्या आणि वादग्रस्त असलेल्या जागांवरून चर्चा पुन्हा अडखळली आहे.

(नक्की वाचा-  Washim News: वाशिममध्ये भाजप उमेदवाराची 'दादागिरी', ठाकरे गटाच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी)

मराठी बहुल भागांवरून रस्सीखेच

जागा वाटपात सर्वात मोठा पेच 'मराठी बहुल' वॉर्ड्सवरून निर्माण झाला आहे. शिवसेनेने प्रामुख्याने अशा जागांवर दावा केला आहे, जिथे त्यांनी उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेसमधून आयात केलेल्या माजी नगरसेवकांचे वर्चस्व आहे. तसेच, गेल्या निवडणुकीत जिथे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या जागा आपल्यालाच मिळाव्यात असा त्यांचा आग्रह आहे.

दुसरीकडे, भाजपने मुंबईतील मराठी बहुल भागात स्वतःच्या जागा लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. जिथे मराठी मतदारांची संख्या मोठी आहे, तिथे भाजप आपले उमेदवार उतरवण्यासाठी आग्रही आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी सुरू

जागा वाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी आता पुन्हा एकदा महायुतीचे वरिष्ठ नेते सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार, भाजपचे मुंबई निवडणूक प्रमुख आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली आहे. मुंबईसह एमएमआर (MMR) रिजनमध्ये निवडणुका कशा प्रकारे लढवायच्या, याबाबत रणनीती आखली जात आहे.

(नक्की वाचा-  Union Budget 2026: यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार की नाही? का आहे संभ्रम?)

जागा वाटपाचा हा पेच लवकर सुटावा यासाठी दोन्ही पक्षांतील मोठे नेते मध्यस्थी करत आहेत. मात्र, जोपर्यंत मराठी बहुल वॉर्ड्सचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत ही चर्चा पुढे सरकण्याची चिन्हे कमी दिसत आहेत. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीला एकत्रित येणे गरजेचे असल्याने, येत्या काही दिवसांत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com