जाहिरात

What is a Mega Block : मेगा ब्लॉक काय आहे? रविवारी नेमकं काय होतं?

मुंबई लोकल सेवा ही 24 तास सुरू असते. यामध्ये लोकल, मेल आणि एक्स्प्रेसचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रेल्वे सेवा चालविल्याने पायाभूत सुविधांवर मोठा भार पडतो.

What is a Mega Block : मेगा ब्लॉक काय आहे? रविवारी नेमकं काय होतं?

What is a Mega Block : मुंबईकरांच्या आयुष्यात लोकल (Mumbai Local) सेवा अत्यंत महत्त्वाची असते. लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज लाखो नागरिक मुंबई लोकलमधून प्रवास करीत असतात. मध्य रेल्वेवर एक्स्प्रेसही धावत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेला दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. यासाठी दर रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जातो. मेगा ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेवरील अनेक गाड्या रद्द केल्या जातात तर अनेक लोकल धीम्या मार्गाने वळविण्यात येतात. प्रवाशांना हा मेगा ब्लॉक नकोसा वाटत असला तरी मध्य रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत चालण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक असतो. 

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सीएसएमटी ते कर्जत-खोपाली आणि कसारा, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल/वांद्रे, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल आणि ट्रान्स हार्बर मार्गावर नेरुळ/बेलापूर ते उरणपर्यंत पसरलेलं आहे. या 325 किमी उपनगरीय नेटवर्कवर दररोज 1810 हून अधिक उपनगरीय रेल्वे, 210 हून अधिक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातात. 

24 तास रेल्वे सेवा...

उपनगरीय मार्गावर पहाटे 2.06 वाजता पहिली ट्रेन सुटते आणि शेवटची ट्रेन 2.30 वाजता इच्छित स्थळी पोहोचले. तसं पाहता रेल्वे सेवा 24 तास सुरू असतात. या गाड्यांमधून दररोज चाळीस लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. 

लोकल ट्रेनचे तिकीट मिळणार 'व्हॉट्सअ‍ॅप'वर; कशी असेल प्रक्रिया?

नक्की वाचा - लोकल ट्रेनचे तिकीट मिळणार 'व्हॉट्सअ‍ॅप'वर; कशी असेल प्रक्रिया?

मेगा ब्लॉक म्हणजे काय? l What is a Mega Block

मुंबई लोकल सेवा ही 24 तास सुरू असते. यामध्ये लोकल, मेल आणि एक्स्प्रेसचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रेल्वे सेवा चालविल्याने पायाभूत सुविधांवर मोठा भार पडतो. यामध्ये रेल, स्लीपर, सिग्नल सेवा, ओव्हर हेड उपकरणे, इलेक्ट्रिकल फिटिंग्ज, ट्रॅक फिटिंग्ज जीर्ण होत असतात. त्यांची नियमित देखभाल आवश्यक असते, यासाठी दर आठवड्याला रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. 

लोकलमधील शेवटची ट्रेन आणि पहिल्या ट्रेनमध्ये केवळ दोन तासांचं अंतर असतं. हा काळ दररोजच्या देखभालीसाठी पुरेसा नसतो. त्यातही लोकल उशीरा असेल, किंवा तांत्रिक समस्या असल्यास दोन तासांचा वेळही मिळत नाही. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे अनेक अडथळे असतात त्यामुळे देखभाल करणं शक्य होत नाही.  रात्रीच्या वेळी काम करताना दृश्यमानता कमी होणे यासारख्या मर्यादा असतात. त्यामुळे लोकलच्या देखभालीच्या कामासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करणं आवश्यक आहे, याला मेगा ब्लॉक म्हणतात.

मेगा ब्लॉक कसा प्लान केला जातो?

रेल्वेमार्गावर जिथं दुरुस्ती किंवा डागडुजीची गरज आहे, अशा ठिकाणांना लक्ष्य केलं जाते. ठिकठिकाणच्या दुरुस्तीच्या कामांनुसार त्यांची प्राधान्य यादी तयार केली जाते. यानंतर Engineering, Signal आणि Telecommunication, Electrical विभागाच्या बैठका घेतल्या जातात. या बैठकींमध्ये तपशीलवार जॉब चार्ट तयार केले जाता. 

बैठकीत काय ठरतं?

-कामाचं ठिकाण आणि कामाचे स्वरुप
-मशीन आणि मनुष्यबळ कसं तैनात करता येईल याचं प्लानिंग
-सुरक्षितता खबरदारी
-ब्लॉकपूर्व तपासणी, ब्लॉकनंतरही कमिशनिंग स्ट्रॅटेजी
हा सर्व प्लान विभागीय नियंत्रण कार्यालयात एकत्र केला जातो. यानुसार उपकरणं किंवा साहित्याची उपलब्धता, कुशल मनुष्यबळ आणि साइट क्लिअरन्स झाल्यानंतर ब्लॉकची अंतिम अंमलबजावणी केली जाते.

मेगा ब्लॉकमध्ये नेमकं काय होतं? 

मेगा ब्लॉकमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी विभाग, सिंग्नल विभाग, दूरसंचार विभाग आणि विद्युत विभागाचा संबंध येतो. 

अभियांत्रिकी विभागाचं काम...

ट्रॅक टाकणे, फूट ओव्हर ब्रिज बांधणे, गर्डर्सचे लाँचिंग आणि देखभाल यासारख्या सर्व कामांसाठी अभियांत्रिकी विभाग जबाबदार आहे. त्यात रोड ओव्हर ब्रिज, रोड अंडर ब्रिजचे बांधकाम आणि देखभाल यासारख्या रस्ते सुरक्षा कामांचा समावेश आहे. त्यात कार्यक्षम, सुरळीत आणि सुरक्षित ट्रेन ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे ट्रॅक, रेल, स्लीपर, बॅलास्ट आणि इतर पायाभूत सुविधांचे अपग्रेडिंग देखील केले जातात. 

अभियांत्रिकी विभागाकडून केली जाणारी कामं..
रेल, स्लीपर, स्विचेस, स्विच एक्सपेंशन जॉइंट्स, ग्लूइड जॉइंट्स, टर्नआउट्स इत्यादींसह ट्रॅक घटकांची बदली आणि देखभाल. विशेष ट्रॅक लेआउट्सची तपासणी आणि देखभाल. आदी...

पावसाळ्यात केली जाणारी कामं...

- पावसाळ्यात रेल्वे रुळांवरून पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पंप बसवणे
- नाले, कल्व्हर्ट साफ करण्याचे आणि गाळ काढण्याचे काम केले जाते. विशेष जलवाहिनीवर गाळ भरला जातो.
- गाड्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचं काम
- पावसाळ्यापूर्वी घाट विभागात बोगद्याचे पोर्टल उभारणे / बसवणे, रॉकफॉल बॅरियर, बोल्डर जाळे, कॅनेडियन कुंपण आणि रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी.
- याशिवाय मेगा ब्लॉक दरम्यान गर्डर बदलणे, पादचारी पूल / रोड अंडर ब्रिजची संरचनात्मक दुरुस्ती आणि देखभालीचे काम, अनावश्यक संरचना पाडणे यासारखी प्रमुख कामे देखील केली जातात.

मेगा ब्लॉक का आवश्यक आहे?
 

मेगा ब्लॉकमुळे महत्त्वाची कामं सुरक्षित आणि अखंडपणे पार पाडता येतात. मेगा ब्लॉकमुळे जटिल कामं कार्यक्षमतेने करणे शक्य होते. त्यामुळे बिघाड होण्याचा धोका कमी होतो. रविवारी किंवा सुट्टीच्या कालावधीत, ज्या दिवशी रहदारी कमी असते अशा दिवशी मेगा ब्लॉक घेतला जातो. यादिवशी अनेक लोकल रद्द केल्या जातात, तर अनेक लोकल दुसऱ्या मार्गावर वळवल्या जातात. इतर दिवशी रेल्वेचं कामकाज व्यवस्थित राहावं यासाठी दर आठवड्याच्या रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे मेगा ब्लॉक हा व्यत्यत नाही तर आवश्यक विराम आहे. यातून मध्य रेल्वेच्या अतिरिक्त लोड असलेल्या उपनगरीय रेल्वे, लांब पल्ल्याच्या गाड्या यांची देखभाल आणि क्षमता वाढ शक्य आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com